अलीकडे मराठी चित्रपटाच्या संगीतात अनेक नवे प्रयोग होताहेत. आजच्या तरुणाईच्या पसंतीस उतरेल त्यासोबत जुन्या पिढीलाही आपलेस वाटेल अशा आधुनिक संगीताला प्रेक्षकांकडून हमखास दाद मिळतेय. हेच लक्षात घेऊन संगीतप्रधान विषयावर बेतलेला ‘राजा’ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. ‘सत्य साई मल्टी मिडीया प्रा. लि.’ या चित्रपट निर्मिती संस्थेच्या निर्माते प्रवीण काकड यांनी चित्रपटाची निर्मिती केली सहनिर्मिती नरेश साखरे यांची आहे. दिग्दर्शक शशिकांत देशपांडे दिग्दर्शित‘राजा’ चित्रपटातील गीतांचे ध्वनीमुद्रण नुकतेच लोकप्रिय गायक शान व सुखविंदर सिंग यांच्या आवाजात करण्यात आले आहे.
पॉप सिंगरच्या आयुष्यावर बेतलेल्या संगीतप्रधान ‘राजा’ चित्रपटाची कथा-पटकथा दिग्दर्शक शशिकांत देशपांडे यांनी लिहिली असून संवाद मिलिंद इनामदार व शशिकांत देशपांडे यांनी लिहिलेत. गीतकार वलय मुळगुंद लिखित यातील गीतांना संगीतकार पंकज पडघन यांनी संगीत दिलंय. सौरदीप कुमार, स्वरदा जोशी, निशिता पुरंदरे, शरद पोंक्षे, जयवंत वाडकर, सुरेखा कुडची, विनीत बोंडे, पौरस देशपांडे आदी कलाकारांच्या यात भूमिका आहेत. या चित्रपटाचे कॅमेरामन दामोदर नायडू असून निर्मिती व्यवस्थापक पूनम घोरपडे तर कार्यकारी निर्माता – सत्यवान गावडे आहेत. वेशभूषा - पौर्णिमा ओक, रंगभूषा - शरद सावंत व नृत्य दिग्दर्शक संतोष भांगरे अशी इतर श्रेयनामावली आहे. येत्या मार्च महिन्यात ‘राजा’ चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात करण्यात येणार आहे.