गोड गुलाबी प्रेमातून, छोट्या-मोठ्या वादातून मीरा आणि समीरच्या नात्याची जडणघडण होतेय. कधी अबोला, कधी प्रेम समीर आणि मीराच्या नात्यात विविध भावनांची गुंफण बघायला मिळते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणारं हे जोडपं अनेक अडचणींना आजवर एकत्र सामोरी गेलंय. यातून त्यांचं प्रेम बहरत गेलं, नात्यातील विश्वास दृढ होत गेला, पण आता एका गैरसमजामुळे समीर आणि मीराच्या नात्यात निर्माण होणार आहे अविश्वासाची दरी! देसाई कुटुंबाचा विश्वासघात केल्याच्या आरोपाखाली मीराला अटक करण्यासाठी पोलीस ठोठवणार आहेत देसाईंचे दार!
आजीकडून १० लाख रुपये घेऊन मौलिकचं घरातून अचानक गायब होणं, मीराच्या सासूच्या पथ्यावर पडलं आहे. मीराला छळण्याची एकही संधी न सोडणाऱ्या तिच्या सासूसाठी ही आनंदाची बातमी आहे. मौलिकला प्यादं बनवून मीराला चेकमेट करण्यासाठी आता तिच्या सासूनं कंबर कसली आहे. मीरा खिंडीत सापडली आहे. यावेळी तिला समीरच्या सोबतीची नितांत गरज आहे. माहेर आणि सासरच्या मंडळींकडून मीराला एकटं पाडण्यात आलं आहे. संकटात अडकलेल्या मीराला गरज आहे समीरच्या साथीची, मात्र गैरसमजामुळे समीरनेसुद्धा मीराची साथ देण्यास नकार दिला आहे. समीर-मीरामधील विश्वासाचं नातं दुभंगलं आहे. मौलिकच्या प्रकरणामुळे मीरा आणि समीरच्या नात्यात निर्माण झाली आहे अविश्वासाची दरी!
आता ही दरी भरून काढण्यासाठी आजी मीराला एक संधी देऊ करणार आहे. मौलिकला शोधून काढण्याचं आव्हान आजी मीराला देणार आहे. या कामात मीराला मदत करण्याचे आजी समीरला सुचवणार आहे. मौलिकच्या शोधकार्याच्या निमित्ताने एकमेकांपासून दुरावलेले मीरा-समीर पुन्हा एकत्र येतील, अशी आजीची आशा आहे आणि याचमुळे मौलिकचा शोध घेण्यासाठी दोघांना एकत्र येण्याचे आवाहन आजी करणार आहे. समीर आणि मीरामध्ये निर्माण झालेली ही अविश्वासाची दरी भरून येईल का? मीरा आणि समीरला एकत्र आणण्याची आजीची ही खेळी यशस्वी होईल का? मौलिकचा शोध लागेल का? मीरावर करण्यात आलेल्या आरोपांमधून तिची सुटका होईल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, मंगळवार, २३ जानेवारीपासून सोम-शनि. रात्री ८. ३० वाजता 'तुझं माझं ब्रेकअप' फक्त झी मराठीवर..