दर्जेदार सिनेनिर्मितीचे स्वप्न साकारणार
मराठी चित्रपटांची निर्मिती अमराठी निर्मात्यांनी करण्याची परंपरा तशी जुनीच आहे. आजवर अनेक निर्मात्यांनी आशयघन मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे. या यादीत आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. बांधकाम, पायाभूत सुविधा यांसह विविध उद्योगक्षेत्रात आपला लक्षणीय ठसा उमटवणाऱ्या योगायतन समूहाचे डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि संचालिका शीला राजेंद्र सिंह यांनी 'परी हूँ मैं' या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपट निर्मितीत पदार्पण केले आहे. राजेंद्र सिंह यांच्या नव्या इनिंगविषयी त्यांच्याकडून जाणून घेतल्यानंतर लक्षात आले की, एका उदिष्टासह सुरु केलेली ही इनिंग ते यशस्वीपणे खेळतील यात शंका नाही. 'परी हूँ मैं' चित्रपटाचे चित्रीकरण आणि तांत्रिक सोपस्कार संपवून लवकरच चित्रपटगृहात दाखल होणार आहे.
मराठी कला व संस्कृतीविषयी मनात असलेल्या नितांत आदरामुळे डॉ. राजेंद्र प्रताप सिंह यांनी 'परी हूँ मैं' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे. चित्रपट हे मनोरंजनाचे माध्यम असले तरी त्याने समाजाचे प्रबोधन केले पाहिजे, आपल्या रोजच्या जगण्यातील भाव-भावनांचे प्रतिबिंब त्यात उमटले पाहिजे, या उद्देशाने आम्ही एका कुटुंबाच्या प्रवासाची कहाणी या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न केला असल्याचे राजेंद्र सिंह सांगतात.
आपल्या या निर्मितीविषयी बोलताना डॉ. राजेंद्र सिंह सांगतात की, माझा हा मराठी सिनेनिर्मितीचा पहिलाच प्रयत्न आहे. सिनेमाची निर्मितीमूल्ये जाणून उत्तम सिनेमा बनवण्यासाठी खूप प्लॅनिंग कराव लागतं. आपल्या योजना आणि कल्पना पारदर्शी असाव्या लागतात. माझा भर नेहमीच गुणवत्तेवर असतो. चित्रपट निर्मितीकडे केवळ गल्ला किंवा व्यवसाय म्हणून मी पाहात नाही. तुम्ही जर कसदार आणि चांगली कलाकृती सादर केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळतो. या विश्वासाने सामाजिक बांधिलकी या नात्याने एक संवेदनशील विषय समाजापुढे यावा, या उद्देशाने व्यवसाय म्हणून न पाहता चांगल्या विषयावर चित्रपट निर्मिती करण्याचे ठरविले. यासाठी माझ्या पत्नी शीला राजेंद्र सिंह याचे बहुमूल्य सहकार्य लाभले आहे. यापुढेही चांगल्या चित्रपटांच्या निर्मितीचा मानस असून 'परी हूँ मैं' हा चित्रपट प्रेक्षकांना नक्की आवडेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रोहित शिलवंत दिग्दर्शित परी हूँ मैं या चित्रपटात एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा पॅशनेबल प्रवास मांडण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे दमदार कलाकार या चित्रपटात आहेत.