चित्रपटक्षेत्राची कुठलीही पार्श्वभूमी नसताना केवळ इच्छा आणि परिश्रमाच्या जोरावर सात होतकरू तरुणांनी ‘द ऑफेंडर’ – स्टोरी ऑफ अ क्रिमिनल’ या मराठी थरारपटाची निर्मिती केली असून भीती, प्रेम, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा हा चित्रपट येत्या १५ जून ला चित्रपटगृहात दाखल होतोय. त्याआधी या चित्रपटाचा संगीत प्रकाशन सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.
श्री.एस्.एम्.महाजन आणि सौ.व्ही.आर.कांबळे निर्मित ‘द ऑफेंडर’ या चित्रपटात अर्जुन महाजन, डॉ. अमित(श्रीराम) कांबळे, दिप्ती इनामदार, दिनेश पवार पाटील, अनिकेत सोनवणे, सुरज दहिरे, शिवाजी कापसे, सोमनाथ जगताप आणि लव्हनिस्ट आदि कलाकार असून त्यांनी लेखनापासून दिग्दर्शनापर्यंतच्या सर्व भूमिका पार पाडण्याचं शिवधनुष्य यशस्वीरित्या पेललं आहे.
‘द ऑफेंडर’ चित्रपटात २ वेगवेगळ्या जॉनरची गाणी आहेत. ‘अशी तू माझी होशील का’ हे रोमँटीक गीत स्वप्नील भानुशाली यांनी गायलेय तर आरोह वेलणकर यांनी ‘घे भरारी’ हे गीत गायले आहे. या सुमधुर गीतांना आरोह, कृष्णा सुजीत यांनी संगीत दिले आहे. चित्रपटाची कथा डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांची असून पटकथा व संवाद अर्जुन महाजन व डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी लिहिले आहेत. संकलन-दिग्दर्शन आणि गीते अर्जुन महाजन यांची तर सहाय्यक दिग्दर्शन सोमनाथ जगताप यांचे आहे. छायाचित्रणाची जबाबदारी अनिकेत सोनवणे, डॉ. अमित (श्रीराम) कांबळे यांनी सांभाळली आहे. कलादिग्दर्शन सुरज दहिरे, ध्वनीमुद्रण दिनेश पवार आणि निर्मीती व्यवस्थापन शिवाजी कापसे यांनी केलं आहे.
‘द ऑफेंडर’ १५ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.