‘ड्राय डे’ सिनेमातील हळदीचे भन्नाट गाणे लाँच

‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान...’ हे बालपणी प्रत्येकांनी ऐकलेले गाणे, नव्या ढंगात पुन्हा एकदा लोकांसमोर आले आहे, ते ‘ड्राय डे’ या सिनेमाच्या निमित्ताने ! लवकरच प्रदर्शित होत असलेला आनंद सागर प्रॉडक्शन हाऊस निर्मित तसेच पांडुरंग जाधव दिग्दर्शित आणि लिखित ‘ड्राय डे’ ह्या सिनेमातील हे नवंकोरं गाणं असून, नुकतेच त्याचे सोशल नेट्वर्किंग साईटवर लाँचिंग करण्यात आले. समीर सामंत यांनी शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला हिंदीच्या सुप्रसिद्ध गायिका रोन्किनी गुप्ताचा आवाज लाभला असून, अथर्व श्रीनिवासन आणि तृप्ती खामकर यांची साथ तिला लाभली आहे. लोकांना ठेका धरण्यास लावणा-या या गाण्याला अश्विन श्रीनिवासन यांनी ताल दिला आहे. मोनालिसा बागल आणि आयली घिए यांच्यावर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्यात, हळदीचा माहोल पाहायला मिळतो. लग्नाआधी होत असलेल्या हळदीची मज्जा जर चाखायची असेल, तर हे गाणे नक्कीच पाहावे असे आहे. 
तरुणाईने बहरलेल्या गुलाबी दुनियाची रंगीत सफर घडवून आणणारा हा सिनेमा, लवकरच कॉलेज तरुणाईसाठी मोठी पर्वणीच घेऊन येत असून, ऋत्विक केंद्रे आणि मोनालिसा बागल या जोडीची लव्ह केमिस्ट्री जणू आपलीच असल्यासारखी वाटेल अशी आहे. 
डीओपी नागराज दिवाकर यांच्या कॅमेऱ्यात चित्रित झालेल्या या सिनेमाची नितीन दीक्षित यांनी पटकथा व संवाद लिहिले असून, अमित कुमार यांनी संकलन केले आहे. यात कैलाश वाघमारे, योगेश माधव सोहनी, पार्थ घाडगे, चिन्मय कांबळी, जयराज नायर आणि अरुण नलावडे अशी कलाकारांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :