छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेल्या ‘फर्जंद’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाचा लागली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूडचे ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘फर्जंद'चे पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे. पोस्टरमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी ची प्रस्तुती असणारा ‘फर्जंद' १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘फर्जंद' चित्रपटातून एक शिवकालीन लढाई आपल्या समोर येणार आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर कशी यशस्वी चढाई केली होती? याचा रोमांचकारी इतिहास ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.
या चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.