हिंदी सिनेसंगीताचं स्वर्णयुग आठवताक्षणी गाजलेल्या चित्रपटातील अजरामर गाण्यांसोबतच विस्मरणात गेलेल्या गाण्यांचीही आपल्याला आठवण येऊ लागते. त्याचबरोबर त्या गाण्यांच्या गायक, गायिका संगीतकार, गीतकार आणि नायक, नायिकांनाही विसरता येत नाही अशा अप्रतिम २५ गाण्यांचा प्रवास एका संगीतमय कार्यक्रमातून उलगडला जाणार आहे, ‘सिल्व्हर व्हॉईसेस् असं शीर्षक असलेल्या या कार्यक्रमाची निर्मिती ‘प्रतिष्ठा निर्मिती' संस्थेने केली असून या कार्यक्रमात सुरैया, नूरजहाँ, लता, आशा, सुमन, मुबारक, शमशाद बेगम पासून अलीकडील काळातील अलका, कविता ते श्रेया घोषाल अशा २५ गायिकांनी, २५ नायिकांसाठी गायिलेली २५ संगीतकारांची २५ चित्रपटातील गाणी प्राजक्ता सातर्डेकर, शुभदा वेरेकर, नीरजा विंझे, नम्रता थोटम आणि विद्या करलगीकर यांच्या सुरील्या आवाजात सादर केली जाणार आहेत. अरविंद मुखेडकर व संजय मराठे यांचे संगीत संयोजन असलेल्या या यादगार वाद्यवृंदाचे निर्माते, संकल्पनाकार आणि निवेदक आहेत रत्नाकर पिळणकर. असा हा रसिकप्रिय कार्यक्रम गुरुवार दिनांक १९ एप्रिल २०१८ रोजी रात्रौ ८ वाजता शिवाजी मंदिर, दादर, मुंबई येथे आयोजित केला असून या कार्यक्रमाची निर्मिती व विस्तार एम्. एस्. एंटरप्रायझेसच्या मधुरा त्रिभुवन करणार आहेत. ऑर्केस्ट्राच्या क्षेत्रातील एक वेगळीच संकल्पना व अप्रतिम गायिका असा सुयोग जुळून आल्याने हिंदी सिनेसंगीताच्या शौकीनांना श्रवणीय गाणी ऐकण्याची ही उत्तम संधी आहे.