शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये काही मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं आहे. तानाजी मालुसरे हे त्यापैकीच एक नाव आहे. जिथे जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांचा उल्लेख येतो तिथे तिथे तानाजी मालुसरे हे नाव आपसुकच घेतलं जातं. आजवर कधी खलनायकी तर कधी सद्गृहस्थाच्या भूमिकेत दिसलेले अभिनेते गणेश यादव ‘फर्जंद’ या आगामी मराठी सिनेमात तानाजी मालुसरेंच्या रूपात प्रेक्षकांना भेटणार आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती असलेला हा चित्रपट १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
‘सुभेदार तानाजी मालुसरे’ हे नाव घेताच डोक्यावर पगडी, रुंद चेहरा, भारदास्त मिशा, हाती ढाल-तलवार घेतलेली निधड्या छातीची व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभी राहते. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने जेव्हा ‘फर्जंद’ या सिनेमाची पटकथा लिहिली तेव्हा त्याच्या नजरेसमोर असंच काहीसं वर्णन असलेला कलाकार उभा राहिला तो म्हणजे गणेश यादव. ‘फर्जंद’च्या माध्यमातून लेखनाकडून सिनेदिग्दर्शनाकडे वळताना दिग्पालने आजवर कधीही समोर न आलेला इतिहास जगासमोर मांडण्याचं आव्हान स्वीकारलं आहे.
या कामी त्याला केवळ दिग्गज कलाकारांची नव्हे तर ऐतिहासिक व्यक्तिरेखांना उचित न्याय देऊ शकणाऱ्या कलावंतांची आवश्यकता होती. यासाठी तानाजी मालुसरेंचा सिंहगडावरील अर्धपुतळा आपल्या डोळ्यांसमोर होता आणि त्यातूनच गणेश यादव यांची या भूमिकेसाठी निवड झाल्याचं दिग्पाल म्हणतो. याकामी निर्माते संदिप जाधव यांची खूप मदत झाल्याचं सांगत दिग्पाल म्हणतो की, आमचा सिनेमा एका मोठ्या चेहऱ्याने सुरू व्हावा असं वाटत होतं. त्याच बरोबरीने तो नट सिनेमाच्या प्रारंभीच्या दृश्यांमध्येच प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास सक्षम असावा या गोष्टी प्रामुख्याने डोक्यात होत्या. गणेश यादव यांच्याकडे हे कसब असल्याने त्यांना अॅप्रोच झालो. सिनेमाचं वाचन करून दाखवल्यावर त्यांना ही ते आवडलं. या सिनेमातील अॅक्शन डिझाइनने त्यांना आकर्षित केलं होतं. त्यांचा लुक पाहिल्यावर आम्ही सर्वचजण प्रेमात पडलो.