यूटय़ूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत. त्यातील ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. यूटय़ूबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ‘भाडिपा’ चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवार २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्रौ ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केलीय.
सोशल मीडियावर लोकप्रिय असणारे सारंग साठे, चेतन मुळ्ये, मंदार भिडे, आणि ओमकार रेगे हे चार विनोदवीर या शो चे सादरीकरण करणार आहेत. प्रत्येक शहराची तसेच तिथल्या माणसांची एक खासियत असते. हीच खासियत विनोदी ढंगात अनुभवण्याची मजा या शो मधून प्रेक्षकांना मिळणार आहे. या संकल्पनेबद्दल बोलताना ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना सांगतात की, सोशल मीडियावरील या विनोदवीरांना घेवून अशा प्रकारचा लाइव्ह शो करण्याची कल्पना वेगळी असली तरी प्रेक्षक या ‘शो’ चे नक्की स्वागत करतील असा विश्वास या दोघांनी व्यक्त केला.