'ती सध्या काय करते?' या चित्रपटाद्वारे २०१७ ची धमाकेदार सुरुवात करणारा अंकुश, या वर्षाचा उतरार्धदेखील यशस्वी करण्यास सज्ज झाला आहे. कारण, महाराष्ट्राचा स्टाईल आयकॉन असणाऱ्या अंकुशची प्रमुख भूमिका असलेला 'देवा' हा सिनेमा, येत्या १ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स निर्मित, या सिनेमातील अंकुशचा व्हायरल झालेला अतरंगी लूक, त्याच्या चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरत आहे. दक्षिणात्य दिग्दर्शक मुरली नलप्पा यांचे दिग्दर्शन या सिनेमाला लाभले आहे.
कोकणातील निसर्गरम्य परिसरात या सिनेमाचे चित्रिकरण पूर्ण झाले असून, श्रेया घोशाल, सोनू निगम या हिंदीतील सुप्रसिद्ध गायकांनी 'देवा' सिनेमातील गाण्यांना आपला आवाज दिला आहे. तसेच मराठी संगिताचे जादुगार अमितराज यांनी या गाण्यांना संगीत दिले असल्यामुळे, 'देवा' हा सिनेमा सिनेरसिकांसाठी मनोरंजनाची मेजवाणी ठरणार आहे.