झी मराठीवर उलगडणार कथा समृद्धीच्या

दिग्दर्शिका अॅड. समृद्धी पोरे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे. अभ्यासू, स्वत:ची ठोस व स्पष्ट मत तसेच सामजिक जाणीव जपणाऱ्या कलावंतांमध्ये समृद्धी पोरे यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ‘मला आई व्हायचंय’ आणि ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ या समृद्धी पोरे यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतून त्यांचे सामाजिक भान दिसून आले आहे. झी मराठी वाहिनीवर येणाऱ्या द रिअल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून समाज विकास घड्विण्याचा प्रयत्न समृद्धी पोरे करणार आहेत.
रिझवान आदातिया फाऊंडेशन प्रस्तुत व समृद्धी सिनेवर्ल्ड निर्मित द रिअल हिरो कथा समृद्धीच्या हा कार्यक्रम झी मराठीवर रविवार ९ जुलैपासून दर रविवारी सकाळी ११.३० वा. प्रसारित होणार असून समृद्धी पोरे आपल्याला पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर सूत्रसंचालन करताना दिसणार आहेत. आपल्या नव्या इनिंगबद्दल बोलताना समृद्धी सांगतात की, या कार्यक्रमाने निखळ मनोरंजन तर होईलच सोबत आयुष्याच्या शिदोरीत संस्काराचे फळही निश्चित मिळेल.
अनेक अभ्यासू, दिग्गज व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला वावरत असतात. या मान्यवरांचे अनुभव म्हणजे समृद्ध ग्रंथच. त्यांचे विचार कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न द रिअल हिरो कथा समृद्धीच्याया ‘टॅाक शो’ मार्फत केला जाणार आहे. त्यांच्या यश अपयशाच्या कडू गोड आठवणी या दरम्यान उलगडल्या जाणार असून मान्यवरांचे हे अनुभव जगणं समृद्ध करणारे असतील. मुलाखत चालू असताना एक चित्रही साकार होणार आहे. त्या चित्रावर त्या रिअल हिरोचा सुंदर संदेश लिहिला जाईल. साकार होणाऱ्या चित्रातून जमा होणारा निधी समाजहितासाठी देण्यात येईल.
९ जुलैपासून दर रविवारी सकाळी ११.३० वा. द रिअल हिरो कथा समृद्धीच्याहा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर प्रसारित होईल.

Subscribe to receive free email updates: