'देवा' या अतरंगी व्यक्तिमत्वावर आधारित असलेला सिनेमा म्हंटला तर, या सिनेमाशी निगडीत प्रत्येक गोष्ट ही हटकेच असायला हवी! मग त्या सिनेमाच्या पोस्टरचे मध्यरात्री केलेले लाँचिंग असो, वा एखाद्या सिनेमागृहातील टेक्निशियन्सच्या हस्ते करण्यात आलेल्या 'देवा' सिनेमाच्या टीझरचे सादरीकरण असो, प्रत्येक गोष्टीत आपले वेगळेपण जपणारा हा 'देवा' आता ए.टी.एम. मधून लोकांना भेटणार आहे.
सिनेमाच्या पूर्वप्रसिद्धीसाठी सिनेमाच्या टीमने राबवलेली ही भन्नाट शक्कल लोकांनादेखील आवडत आहे. महाराष्ट्राच्या २००हून अधिक ए.टी.एम. मध्ये या सिनेमाचा टीझर दाखविला जात आहे. हा टीझर २० सेकंदाचा असून, यामार्फत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात 'देवा' सिनेमाचा बोलबाला केला जात आहे. विशेष म्हणजे, ए.टी.एम.द्वारे अशाप्रकारे सिनेमाचा टीझर दाखवण्याची हि पहिलीच वेळ असून, ह्या अतरंगी संकल्पनेचे कौतुकदेखील होताना दिसून येत आहे.
आपल्या अभिनयाबरोबरच भूमिकेतदेखील नाविण्यपण जपणाऱ्या अंकुश चौधरीची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाची अशी होत असलेली प्रसिद्धी, प्रसारमाध्यमांत चर्चेचा विषय बनत आहे. इनोव्हेटिव्ह फिल्म्स आणि प्रमोद फिल्म्स निर्मित 'देवा' सिनेमाचा हा टीझर नुकताच प्रसिद्ध झाला असून, अल्पावधीतच या टीझरला सोशल नेट्वर्किंग साईटवर अधिक पसंती मिळाली आहे. शिवाय, आता ए.टी.एम. च्या माध्यमातून सामान्य प्रेक्षकांनादेखील याचा आस्वाद घेता येणार आहे.
'देवा' या सिनेमाचे मुरली नलाप्पा यांनी दिग्दर्शन केले असून, अभिनेत्री तेजस्विनी पंडितची देखील यात विशेष व्यक्तिरेखा आहे. अतरंगी 'देवा'च्या रंगबेरंगी प्रवास दाखवणारा हा सिनेमा प्रेक्षकासाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येत आहे.