मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नाविन्यपूर्ण विषयांवर चित्रपटांची निर्मिती होतेय. याच पार्श्वभूमीवर बंगाली भाषिक अनुभवी दिग्दर्शक दासबाबू ‘ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची’ हा सत्यघटनेवर आधारित मराठी चित्रपट घेऊन येताहेत. ‘निखिल फिल्म्स’ची प्रस्तुती असलेल्या ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाची १५ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवातील मराठी चित्रपट विभागात निवड करण्यात आली आहे. मुंबईत येत्या १५ डिसेंबर ते २२ डिसेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.
दिग्दर्शक दासबाबू यांनी याआधी ‘लढा’, ‘श्रीमंताची लेक’, ‘हे बंध रेशमाचे’, ‘एक धागा सुखाचा’ यासारख्या अनेक मराठी मालिकांसोबत ‘तहान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. त्यांच्या ‘ब्रेव्हहार्ट’चित्रपटात एका मुलाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीची आणि जिद्दीची कहाणी आपल्यासमोर येणार आहे. निर्माते सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाची पटकथा-संवाद व गीते श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून अर्नब चटर्जी यांनी संगीत दिलंय. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांनी दिलं असून चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी प्रशांत शामराव पवार सांभाळीत आहेत.
संग्राम समेळ व धनश्री काडगांवकर या युवा जोडीसह अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे. अभय कुलकर्णी, शमा निनावे, कु.अथर्व तळवेलकर, स्वामीकुमार बाणावलीकर यांच्या भूमिका या चित्रपटात आहेत. लवकरच ‘ब्रेव्हहार्ट’सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येईल, त्याआधी १५ व्या थर्ड आय आशियायी चित्रपट महोत्सवामध्ये निवड झाल्यामुळे या सिनेमाचा आस्वाद प्रदर्शनापूर्वीच महोत्सवात घेता येणार आहे.