आपल्या धकाधकीच्या जीवनातून विरंगुळा म्हणून एखादा छंद प्रत्येकाने जोपासावा असं म्हटलं जातं... मग तो छंद शिंपल्या गोळा करण्याचा असो किंवा जुन्या नोटा, पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा असो किंवा आपल्या आवडत्या नटाचे फोटोज् गोळा करण्याचा.... हे छंद माणसाला एक वेगळा आनंद देऊन जातात... मात्र ज्यांना प्रितीचा छंद प्रितीचा छंद जडतो त्यांचं काय?
प्रितीचा छंद लागलेल्या अशाच दोन जीवांची कथा सांगणारा नवा सिनेमा मराठीत येत आहे. या सिनेमाचं नाव 'छंद प्रितीचा' असं असून नुकतंच या चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं. या सिनेमाचं पोस्टर पाहिलं की 'पिंजरा', 'सांगत्ये ऐका' सारख्या चित्रपटांची आठवण होते. तमाशावर आधारित गावापासून ते शहरी माणसांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या या चित्रपटात सुबोध भावे, सुवर्णा काळे यांच्याबरोबरच नवा चेहरा हर्ष कुलकर्णी प्रमुख भूमिकेत दिसणार असून त्यांच्या जोडीला शरद पोंक्षे, विकास समुद्रे, सुहासिनी देशपांडे, गणेश यादव ही कलाकार मंडळी आहेत.
या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन एन. रेळेकर यांनी केलं असून चित्रपटनिर्मिती चंद्रकांत जाधव यांनी केली आहे. छायाचित्रदिग्दर्शन जितेंद्र आचरेकर यांचं असून संगीत दिग्दर्शन प्रविण कुंवर यांनी केलं आहे.
प्रेमला पिक्चर्स निर्मित 'छंद प्रितीचा' हा चित्रपट येत्या 10 नोव्हेंबर ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.