भक्ती संगीतापासून नाट्य संगीतापर्यंत आणि शास्त्रीय रचनांपासून चित्रपट संगीतापर्यंत वैविध्यपूर्ण संगीत... ज्येष्ठ गायक पं. सुरेश वाडकर आणि आघाडीचे शास्त्रीय व उपशास्त्रीय गायक स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली हे सर्जनशील आणि प्रतिभावंत गायक... दर्दी, जाणकार पुणेकर संगीतप्रेमींना ‘स्वरयज्ञ’ ही अलौकिक संगीतानुभूती देणारी बहारदार मैफल येत्या १६ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी ७ वाजता प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे.
निमित्त आहे 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या ८३ व्या वर्धापन दिनाचे. या औचित्याने खास जेष्ठ गायक पं. सुरेश वाडकर आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांच्या मधुरसंगीत सुरांनी समृद्ध करणारी संध्याकाळ विशेष ठरणार असून महाराष्ट्राची सांस्कृतिक पंढरी समजल्या जाणाऱ्या पुण्यातील ‘बालगंधर्व कलारंगमंदिरात’ रसिकांना ती अनुभवता येणार आहे. या अनोख्या मैफिलीत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक आणि 'बँक ऑफ महाराष्ट्र'चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे आदी मान्यवर या वेळी उपस्थित राहून या मैफिलीचा आनंद लुटणार आहेत. या मैफली दरम्यान शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत दिली जाणार आहे. तसंच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम जागृत करण्यासाठी परमवीर चक्र विजेत्या सैनिकांच्या प्रतिमा काही पुण्यातील महाविद्यालयांना ‘वीर सेनानी फाऊंडेशन’ यांच्या सहाय्याने देण्यात येणार आहेत.
या मैफलीद्वारे पं. सुरेश वाडकर आणि स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली प्रथमच एकत्रित संगीत मैफल सादर करणार आहेत. या मैफलीत भक्ती संगीतापासून नाट्यसंगीत ते गझल गायनापर्यंत आणि शास्त्रीय रचनांपासून थेट चित्रपट संगीतापर्यंतच्या सर्व रसिकप्रिय संगीतरचना सादर करण्यात येणार आहेत. या मैफलीचं संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांचं आहे. मंगला खाडिलकर निवेदन करणार आहेत. श्रुती भावे,सागर साठे, निनाद मुळावकर, माधव पवार, मकरंद कुंडले, विनायक नेटके यांची संगीतसाथ लाभणार आहे.
स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांनी या मैफलीविषयी माहिती दिली. 'पं. सुरेश वाडकर यांनी माझ्या अनेक रचना गायल्या आहेत. आम्ही अनेक वर्षं एकत्र काम केलं आहे. मात्र, आम्ही आजवर एकत्र संगीत मैफल केली नव्हती. या मैफलीमध्ये आम्ही दोघं गाणार असल्यानं ती इच्छा पूर्ण होत आहे. वेगवेगळ्या प्रकारचं संगीत प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. मला आणि प्रेक्षकांना हा अनुभव नक्कीच समृद्ध करणारा ठरेल,' असं त्यांनी सांगितलं.