'भय'च्या संगीताला बॉलिवूडचा साज

बॉलीवूडमधील अनेक दिग्गज गायकांनी आणि संगीतकारांनी आपल्या प्रतिभेची मोहोर मराठीचित्रपटात  उमटवली आहे. त्यांच्या आवाजातील मराठी गीतांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. याच पार्श्वभूमीवर सचिन कटारनवरे निर्मित ‘भय’ या मराठी सिनेमाद्वारे गीतकार, संगीतकार आणि गायक अशा तीन आघाड्यांवर बॉलीवूड संगीत कलाकार पहिल्यांदाच एकत्र आले आहेत. ‘५ जी इंटरनशनल’ निर्मितीसंस्थेच्या ‘भय’ या सस्पेन्स थ्रिलर सिनेमाचे दिग्दर्शन राहुल भातणकर यांनी केलंय.
‘रॉकी हँडसम’, ‘इश्क क्लिक’ सारख्या अनेक चित्रपट, मालिका व म्युझिक अल्बमसाठी गीते लिहिणाऱ्या गीतकार शेखर अस्तित्व यांनी ‘भय’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठीत गीतलेखन केलं असून संगीतकार विक्रम माँटरोज यांनी त्या गीतांना सुरेल संगीताची साथ दिली आहे. ‘झी म्युझिक’ प्रकाशित केलेल्या ‘भय’च्या ध्वनीफितीत तीन वेगळ्या धाटणीची गीते ऐकायला मिळणार आहेत. लोकप्रिय हिंदी सिनेमातील गीते, मलिकांची शीर्षकगीते, जाहिराती व जिंगल्समधील आवाजाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारी गायिका तुलिका उपाध्याय यांच्यासोबत ‘तनु वेड्स मनू’, ‘जय हो’ फेम ब्रिजेश शांडिल्य यांनी ‘साजना..’ ‘मी आलो..’ या गीतांना स्वरसाज दिला आहे. सुफी व गझल गायकीत ख्याती असणारे अली असलम यांनी यातील ‘चल रे..’ हे भावपूर्ण गीत गायलं आहे.
समीर फातर्पेकर यांनी ‘भय’मधील गीतांना पार्श्वसंगीत दिलं असून या गीतांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देताहेत हे जाणून घेण्यासाठी यातील गायक मंडळी खूप उत्सुक आहेत. मराठी चित्रपटासाठी गीत गाण्याचा अनुभव या सगळ्यासाठीच धमाल होता. गाण्याचा अर्थ समजून घेत, शुद्ध उच्चारण करून त्यांनी ही गीते गायल्याचे सांगितले. अजय जोशी यांची सहनिर्मिती असलेल्या या ‘भय’चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आशिष चौहान यांनी सांभाळली असून सहकारी निर्माते अनिल साबळे आहेत. १६ डिसेंबरला प्रदर्शित होत असलेल्या ‘भय’चे बॉलीवूड संगीत प्रेक्षकांचे फुल ऑन मनोरंजन करणार हे निश्चित!    

Subscribe to receive free email updates: