बॉलीवूड फंक्शन असो की मराठी सिनेसृष्टीचा समारंभ, एकदा का एखादा सोहळा म्हटला की, त्यात जेवढे आयोजक नसतात त्याच्या तिप्पट प्रायोजक पाहायची आता आपल्या डोळ्यांना सवय लागलीय. पण मराठी फिल्म इंडस्ट्रीचा हार्टथ्रोब गश्मीर महाजनी आपल्या एकेडमीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करताना प्रायोजकांचा आधार न घेताच तो स्वत: आयोजित करण्याला प्राधान्य देतो.
सूत्रांच्या अनुसार, गश्मीर महाजनी गेली सतरा वर्ष आपल्या एकेडमीचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करतोय. आणि वर्षागणिक तो कार्यक्रम अधिकाधिक लॅविश होत चाललाय. गेली दहा वर्ष तर गश्मीरची अकेडमी पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आपला कार्यक्रम भरवते. अशा ठिकाणी कार्यक्रम आयोजित केल्यावर सेट्स-लाइट्सपासून ते कॉस्च्युम्स पर्यंत अनेक गोष्टींवर खर्च होतात. पण खर्चाची तमा न बाळगता आपल्या अकेडमीच्या विद्यार्थ्यांसाठी तो आपल्या खिशातून प्रत्येक गोष्टींवर खर्च करतो.
अकेडमीतल्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, “गश्मीर आपल्य़ा अकेडमीतल्या विद्यार्थ्यांचं वार्षिक कार्यक्रमांअगोदर अक्षरश: पितृत्व स्विकारतो असं म्हटलत तरी चालेल. कार्यक्रमाच्या 15-20 दिवस अगोदरपासून एकेडमीचे विद्यार्थी गश्मीच्याच घरी दिवस-रात्र असतात. त्यांचं खाण-पिणं पाहण्यापासून ते त्यांच्या मेकअप-हेअर-एक्सेसरीज-कॉस्च्युम , परफॉर्मन्सेससाठीचे प्रॉप्स असं सगळं गश्मीर एकट्याने पाहतो. त्यामूळे गश्मीरचे ह्या फंक्शनवर किमान 8 ते 10 लाख खर्च होतात. आणि गश्मीर पहिला स्टार असेल जो स्वत:च्या खिशातून एवढा मोठा खर्च करतोय. पण आपल्या विद्यार्थ्यांना मंच देण्यासाठी तो हे सगळं करतो.”
गश्मीर आपल्य़ा आयोजनाविषयी सांगतो, “वर्षातून एक दिवस येणारा हा दिवस म्हणजे आमच्यासाठी दिवाळी असते. काय करू आणि काय नको, असं झालेलं असतं. त्यात जर मी प्रायोजक आणले तर मग कार्यक्रमाला थोडं मार्केटिंगच स्वरूप येईल. त्यात मराठी-बॉलीवूड सेलेब्सना आणण्यावरही मग भर दिला जाईल. आणि मग विद्यार्थ्यांच्या ऐवजी तेच लाइमलाइटमध्ये येतील. विद्यार्थ्यांना स्टार बनवण्यासाठी निर्मांण केलेल्या स्टेजवर त्यांचा लाइमलाइट हिरावला जाऊ नये. म्हणून माझ्या खिशाला कितीही जड जातं असलं तरीही मी प्रायोजकांशिवाय स्वत: सगळं करण्यावर भर देतो. पैसे नंतरही कमावता येतील. विद्यार्थ्यांच्या आनंदापेक्षा ते निश्चितच मोठे नाहीत.”
यंदा 21 जुलैला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात गश्मीरच्या डान्स एकेडमीचा सतरावा वार्षिक समारंभ होत आहे.