कल्पना विलास कोठारी यांच्या रंगनील क्रिएशन्स निर्मित ‘दशक्रिया’ या चित्रपटाद्वारे नव्या दमाचे दिग्दर्शक संदीप पाटील चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. दशक्रिया हा चित्रपट १७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. या निमित्तानं संदीप पाटील यांच्याशी साधलेला संवाद
दशक्रिया हा चित्रपट करण्यापूर्वी तुम्हाला चित्रपट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव काय होता? दशक्रिया हाच चित्रपट का करावासा वाटला?
- चित्रपटसृष्टीत मी बरीच वर्षे कार्यरत आहे. गजेंद्र अहिरे यांच्यासह नॉट ओन्ली मिसेस राऊत या चित्रपटापासून बऱ्याच चित्रपटांना सहायक दिग्दर्शक म्हणून काम केलं. चित्रपटात अभिनयही केला. त्याशिवाय रूईया कॉलेजमधून मी नाट्यक्षेत्रातही काम करत होतो. हेमंत प्रभू यांच्यासह मालिका केल्या. कळत नकळत या मालिकेसाठी एपिसोड दिग्दर्शक म्हणून काम केलं. अनेक जाहिरातींसाठीही काम केलं. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात काहीतरी वेगळे करावे या हेतूने मी आणि माझे मित्र राम कोंडीलकर यांनी एका चित्रपट कंपनीची स्थापना करून वेगळ्या चित्रपट निर्मितीसाठी दर्जेदार कथांच्या शोधात होतो. चित्रपटासाठी विषय शोधत असतानाच साहित्यिक बाबा भांड यांची दशक्रिया ही कादंबरी आमच्या वाचनात आली आणि आपला पहिला चित्रपट ह्याच कादंबरीवर करायचा हे निश्चित झाले. जगण्यासाठी माणसाला करावी लागणारी धडपड आणि त्याच्या मृत्यूनंतरही होणारं मृत्यूचं व्यापारीकरण याचा उहापोह यात आहे. मला हा विषय अत्यंत महत्त्वाचा, प्रत्येकाच्या जीवनातला एक महत्वाचा घटक वाटला आणि याच कादंबरीवर पहिला चित्रपट करायचं ठरवलं.
या चित्रपटासाठी चार वर्षं का लागली?
- २०१३ मध्ये दशक्रिया ही कादंबरी वाचल्यावर त्यातलं वास्तव डोळ्यापुढे यायला लागलं. मात्र, कादंबरीवर चित्रपट करण्यासाठी तितकीच दमदार पटकथा असणं आवश्यक होतं. संजय कृष्णाजी पाटील यांच्याकडे साहित्यकृतीवर चित्रपट करण्याचा मोठा अनुभव होता. पटकथा करण्यासाठी त्यांना राम कोंडीलकर आणि मी विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडे वेळ नव्हता. मला त्यांनीच काम करायला हवं होतं. त्यामुळे त्यांच्यासाठी जवळपास एक वर्ष थांबलो. त्यानंतर पटकथेचे जवळपास आठ-नऊ खर्डे झाले. बाबा भांड यांच्याशी चर्चा करून पटकथेला अंतिम आकार दिला. त्यानंतर कलाकार निवड, त्यांच्या तारखा, चित्रपटाचं शेड्यूलिंग हे सगळं होईपर्यंत चार वर्षं गेली. कलाकार निवडीतली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कथेचा नायक भानुदास हा छोटा मुलगा आहे. आम्हाला यापूर्वी कोणत्याही चित्रपटात काम न केलेला मुलगा हवा होता. त्यासाठी आम्ही जवळपास दीडशे मुलांच्या ऑडिशन्स घेतल्या आणि आर्या आढाव या मुलाची निवड झाली.
चित्रपटासाठी बाबा भांड यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळाला? पटकथा लेखनासाठी संजय कृष्णाजी पाटील यांच नाव कसं पुढे आलं?
- कादंबरी वाचल्यानंतर चित्रपट करण्यासाठीच्या परवानगीसाठी राम कोंडिलकर यांच्यासह मी बाबांना भेटलो होतो. त्यावेळी चित्रपटाचे हक्क दुसऱ्याकडे असल्याचं त्यांनी सांगितलं. हक्क देऊन १२ वर्षं झाली, तरी त्याचा चित्रपट होत नव्हता. मात्र, बाबांच्या पत्नी आशाताई यांनी आमची धडपड पाहून बाबांना आम्हाला संधी देण्याविषयी सांगितलं आणि एके दिवशी अचानक बाबांचा हक्क देत असल्याचा फोन आला. आमच्यासाठी तो सुखद धक्का होता. त्यानंतर आम्ही जोमानं कामाला लागलो. दशक्रियावर चित्रपट कसा करता येईल, याचा एक आराखडा आम्ही बाबांना सांगितला होता. तो त्यांना पसंत पडला होता. आता आम्हाला सकस पटकथा हवी होती. त्यासाठी संजय पाटील हेच योग्य नाव होतं. संजय पाटील यांच्याकडे साहित्यकृतींवर आधारित चित्रपट लिहिण्याचा मोठा अनुभव आहे. साहित्यकृतींवर बेतलेले जोगवा, पांगिरा, ७२ मैल असे उत्तम चित्रपट त्यांनी लिहिले आहेत. त्याशिवाय महत्त्वाची गोष्ट म्हणजे, काही वर्षापूर्वी राम आणि मी व्हॅनिला कबड्डी हा चित्रपट करत होतो. तो दाक्षिणात्य चित्रपटाचा रिमेक होता. त्याच्या मराठी रूपांतराचं काम आम्ही संजय पाटील यांच्याकडे सोपवलं होतं. त्या चित्रपटच दिग्दर्शन करणार होतो. मात्र, काही कारणानं तो चित्रपट झाला नाही. त्या चित्रपटादरम्यान आमचे छान सूर जुळले होते. स्वाभाविकच, दशक्रियाच्या पटकथेसाठी संजय पाटील यांच्याशिवाय हा चित्रपट होऊ शकला नसता.
दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट करताना काय आव्हान होतं?
- दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट करणं हे मोठं आव्हान असतं. कारण, निर्माता मिळत नाही. त्यात आम्ही निवडला दशक्रियासारखा विषय... त्यामुळे अनेक निर्मात्यांना भेटूनही कुणी तयार होईना. अशात संजय पाटीलच आमच्या मदतीला आले. त्यांनी आमची भेट रंगनील क्रिएशन्सच्या कल्पना विलास कोठारी यांच्याशी घालून दिली. त्यांनी पटकथा ऐकली आणि लगेचच होकार दिला. दशक्रिया ही कादंबरी महत्त्वाची; मात्र, चित्रपट करण्यासाठी अवघड आहे. त्याचा पट मोठा आहे, अनेक व्यक्तिरेखा आहेत. हे सगळं जमवून आणणं नक्कीच आव्हानात्मक होतं.
एवढ्या मोठ्या टीमला कसं काय हाताळलंत?
- दिग्दर्शक म्हणून दशक्रिया माझा पहिला चित्रपट असला, तरी मी या क्षेत्रात नवीन नाही. मात्र, पहिला चित्रपट करताना उत्तम टीम असावी, यावर माझा भर होता. चित्रपटाचं आम्ही स्टोरी बोर्डिंग करून घेतलं होतं. अनिल जाधव यांनी हे काम केलं. त्यामुळे चित्रपट कसा होईल, याचं चित्र स्पष्ट झालं. चांगल्या पटकथेला चांगल्या पद्धतीनं सादर करण्यासाठी चांगला सिनेमॅटोग्राफर असावा लागतो. बऱ्याच सिनेमॅटोग्राफर्समधून महेश अणे यांचं नाव निश्चित झालं. त्यांनीही चित्रपटासाठी उत्सुकता दाखवली. तसंच चंद्रशेखर मोरे यांच्यासारखा अनुभवी प्रॉडक्शन डिझायनर सोबत असल्यानं आमचं काम सोपं झालं. तसंच दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, मिलिंद शिंदे, आदिती देशपांडे, मिलिंद फाटक, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर असे उत्तम आणि अनुभवी कलाकारही सोबत होते.
पहिल्याच चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. त्याविषयी काय सांगाल?
- चित्रपट करताना मनात कसलाच विचार नव्हता. आपल्याला उत्तम चित्रपट करायचा आहे, हे स्वप्न होतं. राष्ट्रीय पुरस्कार हा सर्वोच्च पुरस्कार असतो. तो माझ्या पहिल्याच चित्रपटाला मिळणं ही अत्यंत आनंददायी घटना आहे. या पुरस्कारानं मला नक्कीच प्रोत्साहन मिळालं आहे. आमच्या चित्रपटाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली, कान महोत्सवासाठी चित्रपटाची निवड झाली, हे सगळं पहिल्या चित्रपटाच्या बाबतीत घडल्यानं विशेष आनंद झाला.
दशक्रिया हा चित्रपट प्रेक्षक कशा पद्धतीनं स्वीकारतील असं तुम्हाला वाटतं ?
- दशक्रिया हा चित्रपट प्रेक्षक स्वीकारतील, याची मला खात्री आहे. कारण, मराठी प्रेक्षक सुजाण आहे. चांगल्या कथानकाला प्रेक्षकांनी कायमच स्वीकारलं आहे. त्याशिवाय २१व्या शतकात व्यापारीकरण किती खोलवर रूजलं आहे, याचं चित्रण हा चित्रपट करतो. एक सकस, विचार मांडणारं आणि मनोरंजक असं हे कथानक आहे. प्रत्येक प्रेक्षकाला हा चित्रपट नक्कीच आवडेल.
निर्मात्या कल्पना कोठारी यांचं सहकार्य कसं होतं?
- कल्पना कोठारी यांनी माझ्यावर विश्वास दाखवला, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे. त्यांनी मला कायमच सहकार्य केलं. पहिली निर्मिती करताना सरधोपट चित्रपटापेक्षा दशक्रियासारख्या चित्रपटाची निवड करणं, ही नक्कीच जोखीम होती. ती त्यांनी स्वीकारली. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी बऱ्याच अडचणी आल्या होत्या. आम्हाला चित्रीकरणासाठी नदीला पाणी असलेला घाट मिळत नव्हता. जवळपास चार महिने आम्ही घाट शोधत होतो. तो आम्हाला गारगोटीसारख्या ग्रामीण भागात मिळाला. चित्रीकरणावेळी एकदा पावसामुळे एक शेड्यूल रद्द करावं लागलं होतं. या सगळ्यात त्या खंबीरपणे पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्याबरोबर दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी यांच्यासह सर्व कलाकारांनी कायमच सहकार्य केलं. या सर्वांच्या पाठबळावरच दशक्रिया हा चित्रपट घडला.