छोट्यांच्या विश्वात डोकावून पहिले तर त्या चिमुकल्या मनात विचारांची किती उलथापालथ चालेली असते हे नक्की कळू शकेल. मुलांच्या विश्वात रमताना आपणही लहान होतो. छोट्यांच्या दुनियेत घेवून जात त्यांच्या मनातील विश्व,गायक–संगीतकार शंकर महादेवन उलगडून दाखवणार आहेत.मुलांशी संवाद साधत त्यांच्या बालविश्वात घेऊन जाणारं सुमधुर गीत नुकतेच शंकर महादेवन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्यात आलं. योगायतन फिल्मस् च्या आगामी ‘परी हूँ मैं ’ या चित्रपटातील हे गीत अभिषेक खणकर यांच्या लेखणीतून साकारले असून संगीतकार समीर साप्तीस्कर यांचा सुरेख संगीत साज या गीताला लाभला आहे.
करूया किलबिल चिऊ काऊ सवे जरा... बोलकी बोबडी ...
चांद ताऱ्याची वाऱ्याची विणूया ना जरा मलमली... गोधडी...
वेगे वेगे धावू कुशीमध्ये घेऊ चांदव्यात लपला ससोबा जरासा....
असे बोल असलेल्या या गीतातून बालपणाची मौज त्यातील निरागसता टिपण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. बालविश्वाची सुरेख सफर घडवणारं हे गीत प्रत्येकाला आपल्या बालपणाची आठवण करून देईल, असा विश्वास गायक शंकर महादेवन यांनी याप्रसंगी व्यक्त केला.
जगण्याचा संघर्ष व स्वप्नांचा पाठलाग करण्याचा ध्यास याचा मेळ साधत एका मध्यमवर्गीय कुटुंबाचा ध्येयापर्यंतचा ‘पॅशनेबल’ प्रवास ‘परी हूँ मैं ’चित्रपटात दाखवण्यात आला आहे. नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरा सैनी हे कलाकार या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र प्रताप सिंह आणि शीला राजेंद्र सिंह असून दिग्दर्शन रोहित शिलवंत यांचे आहे. असोसिएट प्रोड्युसर संजय गुजर आहेत.