मराठी रंगभूमी दिन आणि दिवाळीच्या निमित्ताने ब्रिस्बेनकरांना ‘खुमखुमी’त फराळ

ब्रिस्बेनऑस्ट्रेलिया (ता. ५ नोव्हेंबर २०१६):
५ नोव्हेंबर हा दिवस सर्व मराठी रसिक आणि कलावंत यांच्यासाठी खास दिवस समजला जातो कारण श्री. विष्णुदास भावे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. ऑस्ट्रेलिया मधील प्रमुख शहरांपैकी एक असलेल्या ब्रिस्बेन मधील ब्रिस्बेन महाराष्ट्र मंडळाने (ब्रिम्म) हा दिवस महाराष्ट्राबाहेर प्रथमच साजरा करण्याचा बहुमान पटकावला. या विशेष दिनाचे औचित्य साधून त्याच दिवशी समस्त ब्रिस्बेनकरांनी दिवाळी साजरी केली.
मंडळाच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ रंगकर्मी आणि प्रसिद्ध अभिनेते श्री. विजय कदम उपस्थित होते. मराठी रंगभूमीला मानवंदना म्हणून या प्रसंगी श्री कदम यांनी ब्रिस्बेन मधील स्थानिक १८ कलाकारांना घेऊन त्यांच्या “खुमखुमी” या कार्यक्रमाचा प्रयोग सादर केला. कार्यक्रमात श्री. कदम यांच्याबरोबरच ओंकार देशमुख, हरी साठे, तेजस्विनी जोशी, विद्या नामजोशी यांचा अभिनय तसेच अंजली चिपलकट्टी, विभा सोनावणे, कल्पना अग्निहोत्री, मृणाल उदयपुरकर, शाली मोहिते, रिया चिपलकट्टी आणि अवंती गोडबोले यांच्या नृत्याची झलक या प्रसंगी प्रेक्षकांना अनुभवायला मिळाली. कार्यक्रमाला वैशाली चान्दोरीकर, अश्विनी येवलेकर, अतुल देशपांडे, शरद मोरे, विक्रांत देवकर, सुहास चौधरी यांच्या सुरेल संगीताची साथ देखील लाभली. या प्रसंगी श्री. कदम यांचा मंडळाचे अध्यक्ष भूषण जोशी यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना श्री. विजय कदम यांनी सर्व स्थानिक होतकरू कलाकारांनी केलेल्या तयारीचे व त्यांच्या कलागुणांचे कौतुक केले व हा रंगभूमी दिन महाराष्ट्राबाहेर परदेशात प्रथमच साजरा केल्याबद्दल तमाम मराठी रंगकर्मी आणि रसिक प्रेक्षक यांच्यावतीने प्रतिकात्मक भेट म्हणून मंडळाला एक लामणदिवा देऊन मंडळाचे आभार मानले. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी ब्रिम्म च्या कार्यकारिणी मधील भूषण जोशी, सुप्रिया कर्वे, नितीन नाईक, ओंकार देशमुख, ललित दळवी, अमोल देशमुख, चारुशीला कुलकर्णी, केतकी आपटे, सारंग मांडके यांनी केलेल्या अथक प्रयत्नाचे विशेष कौतुक उपस्थित प्रेक्षकांनी केले.
त्या आधी ब्रिस्बेन मधील महिलांसाठी ‘झी मराठी’ वाहिनीवरील लोकप्रिय होम मिनिस्टरच्या धर्तीवर एक रंजक स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या महिलांचा सन्मान श्री. विजय कदम यांच्या हस्ते खास पैठणी देऊन या प्रसंगी करण्यात आला.

Subscribe to receive free email updates: