काव्यवाचन हा नेहमीच एक हृदयस्पर्शी अनुभव असतो. शब्द आणि त्याचे सामर्थ्य यांची जाण असलेले रसिक काव्यवाचनाच्या निखळ आनंदाची अनुभूती नक्कीच घेऊ शकतात. असाच एक तरल अनुभव ‘निखिल फिल्म्स प्रस्तुत’ ‘ब्रेव्हहार्ट’ या मराठी चित्रपटाच्या निमित्ताने रसिकांना घेता येणार आहे. या चित्रपटासाठी प्रतिभावान कवी आणि अभिनेता किशोर कदम उर्फ सौमित्र यांनी आपल्या खास शैलीत एका विशेष कवितेचे काव्यवाचन या चित्रपटासाठी केले आहे.
ऐल तटावर जीवन अवघे... पैल तटावर पूर्णविराम
मधे वाहते संघर्षाची... नदी अनाहत, तिला प्रणाम..!
अशी अर्थपूर्ण काव्यरचना किशोर कदम यांच्या धीरगंभीर आवाजात ऐकणे प्रेक्षकांसाठी सुखद अनुभूती ठरणार आहे. चित्रपटाचा नायक निखिलच्या जिद्दीला सलाम करणारी ही कविता श्रीकांत बोजेवार यांनी लिहिली असून चित्रपटाचे पटकथा-संवाद व गीतेही त्यांनीच लिहिली आहे. सच्चिदानंद गोपीनाथ कारखानीस व संतोष यशवंत मोकाशी यांनी ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटाची निर्मिती केली असून दिग्दर्शन दासबाबू यांनी केले आहे.
संग्राम समेळ व धनश्री काडगांवकर ही युवा जोडी ‘ब्रेव्हहार्ट’ मधून आपल्यासमोर येतेय. अरुण नलावडे, अतुल परचुरे, सुलभा देशपांडे, किशोर प्रधान, डॉ. विलास उजवणे, विजय चव्हाण, इला भाटे, अभय कुलकर्णी, शमा निनावे, कु. अथर्व तळवेलकर, स्वामीकुमार बाणावलीकर आदी कलाकारांच्या भूमिका असलेला हा चित्रपट ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.