एचआयव्हीबद्दल बरीच जागृती होत असली तरी एचआयव्ही बाधितांचे प्रश्न आजही कायम आहेत. एड्सच्या संदर्भात लोकांच्या मनात रुतून बसलेले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करत एचआयव्हीबाधितांना आधार देण्याचे काम रवी बापटले हा अवलिया अविरतपणे करतोय. एड्सग्रस्तांना मानाने जगता यावं यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. ‘ना मुंह छुपाके जियो, और ना सर झुकाके जियो, गमों का दौर भी आये तो मुस्कुराके जियो’ असं सांगत रवी यांचा लढा आजही सुरुच आहे. रवी बापटले यांच्या या लढ्याची कहाणी जाणून घ्यायची संधी येत्या रविवारी ६ ऑगस्टला सकाळी ११.३० वा. झी मराठी वाहिनीवरील द रिअल हिरो कथा समृद्धीच्या या कार्यक्रमात मिळणार आहे. अल्पावधीतच या कार्यक्रमाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
गावात एका एचआयव्हीबाधित मुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्यावर कोणी अत्यंविधीही करीत नव्हते. त्या मृतदेहाची अवस्था पाहिल्यावर हेलावलेल्यारवी बापटले यांनी जन्मतः एचआयव्ही बाधित निष्पाप मुलांसाठी पूर्णवेळ कार्य करण्याचे ठरवले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी त्यांनी एड्सग्रस्तांसाठी ‘हॅप्पी इंडियन व्हिलेज’ची स्थापना केली. या माध्यमातून एचआयव्ही बाधितांना आधार देण्याचे व मुलांना शिक्षणाची कवाडे खुले करण्यासाठी रवी बापटले यांनी पुढाकार घेतला. एचआयव्ही बाधितांच्या मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी रवी बापटले यांनी प्रयत्न केले तेव्हा प्रथम त्यांना विरोध दर्शवला, मात्र हार न मानता रवी बापटले यांनी आपले कार्य सुरूच ठेवत या बालकांसाठी त्यांनी आपले आयुष्य समर्पित केले आहे. या सगळ्यासाठी आपलं घरदार सोडणाऱ्या रवी बापटले यांचा प्रवास हा प्रत्येकासाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
प्रसारण- झी मराठी वाहिनीवर ६ ऑगस्ट सकाळी ११.३० वा.