अशोक पत्की यांचा पहिला संपूर्ण गझलांचा संग्रह!
अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या गझल-संगीतकार जोडीची कलाकृती!
जेष्ठ गायक सुरेश वाडकर, लोकप्रिय अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते प्रकाशन!
अभिजात शब्द-स्वरांच्या एका अभिरूचीसंपन्न उपक्रमाच्या औपचारिक परिचय सोहळ्यासाठी हा स्नेहमेळावा. पुण्यातील ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ ही संस्था गेली ४७ वर्षे ललित’ संगीताच्या क्षेत्रात अभिरूची, गुणवत्ता जोपासणारे कार्यक्रम-उपक्रम सातत्याने करीत आहे.
ललित संगीतातील गझल हा प्रकार त्यातील आशय, शब्दांची विशिष्ट ठेवण-मांडणी यामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. मराठी गझल हा रसिकांचा एक आवडीचा प्रकार आहे. त्यामुळे ‘स्वरानंद प्रतिष्ठान’ने नुकताच ‘चाहूल चांदण्यांची’ हा केवळ आशयघन श्रवणीय गझलांच्या सी.डी.निर्मितीचा उपक्रम संपन्न केला. या गझलांच्या काव्यरचना महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गझलकार-रूबयाकार हिमांशु कुलकर्णी यांच्या असून त्यांना स्वरसाज चढवलाय ख्यातनाम प्रतिभावंत संगीतकार अशोक पत्की यांनी. सध्याच्या पिढीतील रसिकप्रिय युवा-गायिका पूजा गायतोंडे आणि खास गझल गायनासाठी प्रसिद्ध असलेले गायक दत्तप्रसाद रानडे यांनी या गझलांचे मनःपूर्वक गायन करून या शब्दस्वरांच्या बासरीत अक्षरशः प्राण फुंकलेत.
आज हिमांशु कुलकर्णी एक सहृदयी कवी म्हणून त्यांच्या गझलांद्वारे आपल्या समोर येत असले तरी पेशाने ते उच्च व्यवस्थापकीय अधिकारी म्हणून उद्योग जगतात गेली 50 वर्षे कार्यरत आहेत. त्यांनी महाराजा सयाजी विद्यापीठातून बी.टेक.चे सुवर्णपदक प्राप्त पदवीधर असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद येथून एम.बी.ए.ची पदवी प्राप्त केली. प्रारंभी सोलापूर येथील लक्ष्मी विष्णु मिल्समध्ये जनरल मॅनेजरची नोकरी करून पुढे पुण्यात कल्याणी ब्रेक्स येथे मॅनेजिंग डायरेक्टर म्हणूनही अनेक वर्षे कार्य केले. पेशाने व्यवस्थापक म्हणून कार्यरत असले तरी काव्यप्रतिभेच्या क्षेत्रात हृदयाने आपल्या आशयघन, प्रतिभासंपन्न रचना गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्यातूनच त्यांचे ‘बाभुळवन’, ‘मी-माझी सावली’, ‘पणती जपुन ठेवा’, ‘शहर-एक कबर’, ‘कविता उद्ध्वस्त रात्रींच्या’, ‘ह्या पाणपोईवर मिळते फक्त तहान’ हे मराठीतील काव्यसंग्रह आजवर प्रसिद्ध झाले असून ते मराठी साहित्य विश्वात खूपच लोकप्रिय आहेत.
‘चाहूल चांदण्यांची’ या अल्बमच्या आधी त्यांच्या ‘क्षितीज’ (संगीतकार - रवी दाते), ‘व्यथा चंदेरी’ (संगीतकार-गिरीश जोशी) या ध्वनिफिती प्रकाशित झाल्या असून त्यांना रसिकांची चांगली दाद मिळाली आहे. दूरदर्शन व आकाशवाणीवरून त्यांच्या गझला अनेकदा प्रसारित झाल्या आहेत. राजहंस प्रकाशनातर्फे हिमांशु कुलकर्णी यांचा नुकताच ‘क़तरा क़तरा गम’ हा उर्दू काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला असून लवकरच आणखी दोन काव्यसंग्रह येणार आहेत.
कवी हिमांशु यांच्या काव्यात्मकतेचा प्राजक्तगंध असलेल्या गझलांना सिद्धहस्त ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी हळुवार स्वरांनी गोंजारलय, सजवलय. अर्थगर्भ शब्दांवर स्वरांचा मुलामा आहे, कोलाहल-कर्कश्य कल्लोळ नाही. फक्त आहे खानदानी स्वरांचा अभिजात स्वरसाज. अशोक पत्की यांनी यापूर्वी चित्रपटांसाठी तसेच भावगीत म्हणून काही गझलांना स्वरबद्ध केले आहे. परंतू त्यांनी स्वरबद्ध केलेल्या श्रवणीय आठ गझला ‘चाहुल चांदण्यांची’ आल्बमद्वारे एकत्रितपणे सादर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पत्कीसाहेबांनी हिमांशु यांच्या गझला त्यांच्या पुस्तकातून तसेच प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच ऐकल्या तेव्हा ते अक्षरशः भारावून गेले. हिमांशु मराठी सारस्वतातील एक प्रतिभावान कवी आहेत याची जाणीव पत्कीसाहेबांना झाली आणि त्यातूनच त्यांच्या निवडक गझलांना स्वरबद्ध करण्याचे त्यांनी मनावर घेतले. पत्कीसाहेबांच्या मते कवी हिमांशु यांनी वेगवेगळे नवनवीन विषय घेऊन गझला केल्या आहेत. त्या गझलांची भाषा आपल्याला अलगद भारावून टाकते आणि त्या रचनांच्या आपण प्रेमात पडतो. ‘‘पूजा गायतोंडे आणि दत्तप्रसाद रानडे यांनी आपल्या भावपूर्ण गायनाने या गझलांची उंची अधिकच वाढविली आहे. या गझलांच्या अल्बममुळे एक चांगले काम केल्याचे समाधान नक्की मिळालंय’’ असं पत्कीसाहेब म्हणतात. कवी हिमांशु कुलकर्णी आणि संगीतकार अशोक पत्की यांच्या अमृतमहोत्सवाच्या टप्प्यावर (७५) युनिव्हर्सल म्युझिक कंपनीने रसिकांसाठी स्वरानंद प्रतिष्ठाननिर्मित ‘चाहूल चांदण्यांची’ हा अल्बम सादर करण्याचे औचित्य साधले आहे.
हा कार्यक्रम नुकताच मुंबईतील सिटीलाईट येथे अनोख्या धर्तीवर संपन्न झाला. या सोहळ्याला अष्टपैलू गायक सुरेश वाडकर, सोनाली कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे होते तर, मानव नाईक, विनोदवीर विक्रम साठ्ये, युनिव्हर्सलचे राजन प्रभू, रेड बॉक्स इव्हेंट्सचे अक्षय कुलकर्णी, स्वरानंद प्रकाशनचे कार्यकारी विश्वस्त प्रा. प्रकाश बोन्डे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण नूलकर यांनी केले.