गणेशोत्सव आता अवघ्या काही दिवसांवरच येऊ घातला आहे. या सणाच्या काळात चित्रपटसृष्टीही नवनवीन गणेशगीतांद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करीत असते. यामुळेच गणेशोत्सवात यंदा कोणतं नवं चित्रपटगीत गजाननाचं स्वागत करणार याची उत्सुकता गणेशभक्तांनाही लागलेली असते. ‘आर.पी.जी प्रॉडक्शन’ प्रस्तुत व राजश्री गायकवाड निर्मित ‘हिरो’ या आगामी मराठी सिनेमातील गणपतीचं गीत प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झालं आहे.
‘सुखकर्ता तू दु:खहर्ता तू हे लंबोदर तू मोरया’ असे बोल असलेले हे गीत कौस्तुभ पंत यांनी लिहिले असून अमन त्रिखा यांनी आर्तपूर्ण स्वरात गायलं आहे. अंकित शहा यांचा संगीतसाज या गीताला लाभला आहे. नृत्यदिग्दर्शन फिरोज खान यांचं आहे. अभिनेता भूषण पाटील, कुणाल शिंदे, अभिनेत्री वैष्णवी कर्मारकर यांच्यावर हे गीत चित्रीत करण्यात आलं आहे. बाप्पाचं हे गीत भक्तांची भक्ती व आस्था नक्कीच वाढवेल असा विश्वास चित्रपटाचे दिग्दर्शक एन.एन सिद्दिकी यांनी व्यक्त केला आहे.