मानवी भावभावनांचा 'आरसा' मांडणारे सिनेमे मनात घर करून जातात. दिग्दर्शकाची सर्जनशीलता आणि ताकदीचा विषय या दोहोंमुळे यशस्वी झालेल्या मराठी सिनेमांच्या यादीत 'तुला कळणार नाही' या सिनेमाचादेखील आता आवर्जून उल्लेख करावा लागेल. कारण, ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने कळतनकळत रसिकांच्या हृदयात आपले स्थान मिळवले आहे. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलाच गल्ला कमावला असून, पहिल्याच दिवशी म्हणजे शुक्रवारी या चित्रपटाने २४.५ लाखाची कमाई केली. तर शनिवारी ३७ लाख आणि रविवारी ४९ लाख कमावले असून हा आकडा एकूण १ करोड १० लाख इतका झाला आहे. सुबोध आणि सोनालीची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा वैवाहिक दाम्पत्यांच्या भावविश्वावर भाष्य करतो.
लग्न होऊन चार-पाच वर्ष झालेल्या विवाहित जोडप्यांचा जणू बायोपिकच यात मांडला असल्याचे दिसून येते. प्रेमाचा गुलमोहोर लग्नाच्या अनेक वर्षानंतर जेव्हा गळून पडतो, तेव्हा ती रिक्त जागा भरून काढण्यासाठी 'सॉरी' आणि 'थँक्स' हे दोन शब्द कामी येतात. नेहमीचे वाद आणि भांडणामुळे वितुष्ट निर्माण झालेल्या या नात्याला, पुन्हा रिस्टार्ट करण्याची गरज आली आहे. असा सल्ला हा सिनेमा देतो. विशेष म्हणजे, हा सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जोडप्यांनी आपले हँग झालेले पुन्हा रिस्टार्ट केले आहे. हा सिनेमा पाहून आल्यानंतर विवेक-मिताली आणि शरद-प्राप्ती या जोडप्यांनी परस्परांमधील अबोला, हेवेदावे बाजूला सारून नव्याने सुरुवात करण्याचे ठरवले आहे.
'कामाच्या गडबडीत आम्ही एकमेकांना वेळ देऊ शकत नव्हतो, आमच्यातील संवाद कमी झाले होते, मात्र ह्या सिनेमाचा ट्रेलर पाहिला असता, थोडा वेळ एकमेकांसाठी काढून हा सिनेमा आवर्जून पाहायला गेलो होतो, आणि खरंच आमच्या नात्यात निर्माण झालेल्या पोकळीचा आम्हांस उलगडा झाला.' अशी प्रतिक्रिया सिनेमा पाहून आल्यानंतर या जोडप्यांनी दिली.
नवरा-बायकोच्या नात्यातील भावनिक बंध अधिक दृढ करण्यास हा सिनेमा यशस्वी होत असून, सुखी संसाराची सूत्रे मांडण्याचा पुरेपूर प्रयत्न दिग्दर्शिका स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केला आहे. शिवाय, राहुल अंजलीच्या या लग्नानंतरच्या प्रेमकथेत, टप्प्याटप्प्यांवर आपणास नवनवीन कलाकार देखील भेटतात. ज्यात सुशांत शेलार, जयवंत वाडकर, संग्राम साळवी, उदय टिकेकर, उदय नेने, निथा शेट्टी, रसिका सुनील, अनुराधा राज्याध्यक्ष याचा समावेश असून, या कलाकारांनी देखील आपापल्या भूमिकेला चांगला न्याय दिला आहे.
सक्षम फिल्म्स आणि जीसिम्स प्रस्तूत तसेच सिनेकोर्न इंडियाचे सौजन्य लाभलेल्या ह्या सिनेमात स्वप्नील जोशी, कार्तिक निशानदार, अर्जुन बरन आणि श्रेया योगेश कदम या निर्मात्यांची मोठी नांदी लाभली असून निरव शाह, इलाची नागदा आणि जयेश मुझुमदार हे सहनिर्माते आहेत. प्रेम करून लग्न करणा-यांनीच नव्हे तर लग्नानंतर प्रेम करणाऱ्या जोडप्यांसाठीदेखील हा सिनेमा मोठी पर्वणी ठरत आहे.