मराठी चित्रपटांनी सातासमुद्रापार झेप घेतल्याची गोष्ट आता नवीन राहिलेली नाही. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कार्यक्रम परदेशातसुद्धा होऊ लागले आहेत. परंतू मराठी चित्रपटाचा प्रिमिअर परदेशात होण्याची घटना विरळच. २ मार्चला प्रदर्शित होणाऱ्या ‘भय’ या आगामी मराठी चित्रपटाचा शानदार प्रिमिअर सोहळा नुकताच दुबईत संपन्न झाला. चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ तसेच दुबईस्थित मराठीजनांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शुक्रवार २३ फेब्रुवारीला दुबईच्या रॉक्सी थिएटर मध्ये संपन्न झालेल्या या शो ला दुबईच्या स्थानिक कलाकारांनी सुद्धा आवर्जून हजेरी लावली होती. ५ जी इंटरनॅशनलची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती सचिन कटारनवरे यांनी केली असून दिग्दर्शनाची व संकलनाची जबाबदारी राहुल भातणकर यांनी सांभाळली आहे.
एका वेगळ्या विषयावर चित्रपट केल्याचं समाधान व्यक्त करतानाच उपस्थित सर्वांचे आभार निर्माते सचिन कटारनवरे व कलाकारांनी याप्रसंगी व्यक्त केले. हा चित्रपट प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झाल्याच्या भावना उपस्थित प्रेक्षकांनी यावेळी व्यक्त केल्या.
भीती काल्पनिक असली तरी, त्या अनुषंगाने उलटसुलट विचार आपल्या मनात घोळत राहिल्याने आपलं उर्वरित शरीर सुद्धा या भीतीच्या दहशतीखाली येते. ही भीती भविष्याशीच निगडित असल्याने, काहीतरी अघटित घडणार असंच बरेचदा वाटत राहतं. हा आपल्या कल्पनाशक्तीचा खेळ वेळीच सावरला नाही तर काय होऊ शकतो हे दाखवून देणारा चित्रपट म्हणजे...‘भय’.
अभिजीत खांडकेकर, उदय टिकेकर, सतीश राजवाडे, स्मिता गोंदकर, संस्कृती बालगुडे, विनीत शर्मा, सिद्धार्थ बोडके, शेखर शुक्ला, नुपूर दुधवाडकर,धनंजय मांद्रेकर आदि कलाकारांचा अभिनय ‘भय’या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळेल.
येत्या शुक्रवारी २ मार्चला ‘भय’ प्रदर्शित होणार आहे.