कविता ही वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटत असते. अनेकदा ही कविता फक्त आपल्या स्वत:पुरतीच असते तर कधी तिचा सामूहिक आविष्कार होत असतो. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेल्या रेश्मा कारखानीस यांच्या मनातील अलवार भावनांना शब्दरूप लाभले आणि त्यातून साकार झाला ‘मी शून्य’ या शब्दांचा सुरेल प्रवास. त्यांच्या या कवितेचा प्रवास जाणून घेतल्यानंतर जीवनविषयक दृष्टीकोनाच सार त्यांनी आपल्यासमोर मांडला असल्याचे जाणवत राहते.
रेश्मा कारखानीस यांचा काव्य प्रवास अगदी अलीकडचा म्हणजे ३ ते ४ वर्षापूर्वीचा आहे. साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या रेश्मा यांना कविता स्फुरायला लागल्या आणि त्यातून साकार झाला विविध कवितांचा अनुभव देणारा ‘मी शून्य’ हा कविता संग्रह. या कविता संग्रहातील कवितांचा कार्यक्रमप्रियल क्रिएशनतर्फे मुंबई, पुणे, यासारख्या विविध शहरात आयोजित केले जातात. या काव्यवाचन कार्यक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आजवर लाभला आहे. कवितेला सुरांची साथ मिळाली तर तिचे सौंदर्य आणखी झळाळून येते. रेश्मा यांना गायक केतन पटवर्धन यांची चांगली साथ लाभली असूनकवितांची सुरेल मैफल साकारणारा हा प्रवास सहजसुंदर आणि आनंददायी झाला.
‘प्रत्येक गोष्टीचं असणं अथांग अश्या नसण्यात आहे. असणंच काढून घेतलं तर उरतं नसणं या नसण्याचा प्रवास म्हणजेच ‘मी शून्य’. एका बिंदूपासून सुरु झालेला बिंदूचा संपणारा वर्तुळाकार जीवनप्रवास म्हणजे ‘मी शून्य’. या काव्यसंग्रहाला मधु मंगेश कर्णिक व संगीतकार कौशल इमानदार यांची प्रस्तावना लाभली असून सुलेखनकार अच्युत पालव यांची सजावटीने या संग्रहाचे मुखपृष्ठ सजले आहे.
कवितेच्या माध्यमातून माणसांच्या जगण्याशी संबंधित कोणतीही गोष्ट चांगल्या पद्धतीने मांडल्यास ती सर्वांनाच आपलीशी वाटू लागते. रेश्मा कारखानीस यांच्या कवितेचेही असेच आहे. शब्दांची काव्यसुमनं ओंजळीत न ठेवता मुक्तपणे रसिकांवर त्याची उधळण करत भावभावनांना मोकळी वाटकरून देणाऱ्या त्यांच्या कविता रसिकांना आपल्याशा वाटू लागल्या. कृष्णा पुन्हा एकदा अवतार घे, ‘सर्वगुण संपन्न बायको म्हणे असते केवळ अफवा, काय सांगतोस भोलनाथा पाऊस नाही पडणार का? यासारख्या त्यांच्या कवितांना फेसबुक व व्हॅाटसअप सर्वाधिक व्हूयुज मिळाले आहेत. ‘मी शून्य’ ची पुढील मैफिल येत्या काही दिवसात रंगणार आहे.
सोमवार ५ मार्च - गडकरी रंगायतन दुपारी ४.०० वा.
बुधवार ७ मार्च - शिवाजी मंदिर दुपारी ३.३० वा.
गुरुवार ८ मार्च – दिनानाथ मंगेशकर सभागृह ४.०० वा.
शुक्रवार ९ मार्च - विष्णूदास भावे सभागृह ४.३० वा.