कला, क्रीडा, संस्कृती, ज्ञान, मनोरंजन कार्यक्रमांची दर्जेदार मेजवानी देणाऱ्या नवरस आर्ट अॅकडमीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या "गावस्कर,तेंडुलकर, कोहली" असा क्रिकेट विश्वातील तीन अव्वल भारतीय फलंदाजांवरील आगळावेगळा कार्यक्रम रविंद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरमध्ये मोठ्या दिमाखात नुकताच संपन्न झाला. पुस्तक प्रकाशन, अनुभव कथन आदी कार्यक्रमांची झक्कास मेजवानी यावेळी रसिकांना मिळाली.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री. द्वारकानाथ संझगिरी लिखीत "संवाद लेजेण्ड्सशी" ह्या पुस्तकाच्या चौथ्या आवृत्तीचे प्रकाशन केसरी टूर्सचे संस्थापक मा. केसरी भाऊ पाटील यांच्या हस्ते झाले. त्यानंतर मुख्य कार्यक्रमात संझगिरी ह्यांनी क्रिकेटविश्वातील नामवंत खेळाडू माधव आपटे, वासू परांजपे,मिलिंद रेगे, प्रवीण आमरे, अनिल जोशी ह्यांच्याशी तिन्ही क्रिकेटपटूंबद्दल विविध प्रश्न विचारून मुक्त संवाद साधला. या सगळ्या मान्यवरांनी आपल्या अनुभव कथनातून गावस्कर, तेंडुलकर, कोहली यांच्यासारख्या दिग्गजांचे मोठेपण कशात आहे, हे खुमासदार शैलीत मांडले. क्रिकेटशी संबधित अनेक दुर्मिळ ऑडिओ व्हिजुअल्स पहायला मिळाल्यामुळे रसिकांसाठी ती पर्वणीच ठरली.
ह्या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती व आयोजन श्री. प्रसाद फणसे आणि नवरस आर्ट अकॅडमीने केले होते.