कुटुंबाचा केंद्रबिंदू असलेली स्त्री म्हणजेच मुलाची आई , जेव्हा सूनरूपी दुसरी स्त्री घरात येते तेव्हा साधारणपणे तिची मानसिकता बदलते अर्थात अत्यंत प्रेमाने, आदराने नीटच नाते जोपासणाऱ्या पुष्कळ स्त्रिया आहेत. मात्र “सासूबाई’ ही उपाधी लागली की सत्ता, मानपान व अपेक्षा आणि तुलना या विकारांमध्ये ती जखडली जाऊ शकते. याउलट सासू, सुना सुज्ञ, समंजस असतील तर घरात “स्वर्ग’ उतरतो. दर आठवड्याला नात्यांची नवी गोष्ट देण्याचं प्रॉमिस झी युवा पाळत आहे. हीच परंपरा कायम राखत एक सुंदर कथा ही युवा वाहिनी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलेली आहे. जगाच्या पाठीवर कायमच चर्चेत असलेलं एक नातं म्हणजे सासू आणि सूनेचं नातं. याच नात्याची एक गमतीदार गोष्ट येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १२ मार्च आणि १३ मार्च ला पाहायला मिळणार आहे. सासूच्या भुमिकेत वंदना गुप्ते, शिवानीच्या भूमिकेत स्वानंदी टिकेकर आणि जय च्या भूमिकेत अक्षय वाघमारे या कथेतून भेटणार आहेत.
आईच्या आदरयुक्त धाकात वाढलेला जय. एका बोल्ड एण्ड ब्युटिफुल मुलीच्या म्हणजेच शिवानीच्या प्रेमात पडतो खरा पण आईला कसं सांगणार हा प्रश्न काही सुटत नाही. शिवानी मात्र आजच्या तरूणींचं प्रतिनिधित्व करणारी आहे. आपल्याला जे हवं ते मिळवण्यासाठी काहीही करण्याची तिची तयारी आहे. त्या अपरोक्ष जयची आई त्याच्यासाठी मुली शोधते आहे आणि अचानक जय आणि शिवानी लग्न करून दारात उभं राहतात. अचानक घडलेल्या या घटनेमुळे आईला धक्का बसतो. आता आई जय आणि शिवानीला घरात घेणार का? सून म्हणून शिवानीला आता काय काय करावं लागणार? शिवानी या परिक्षांमध्ये पास होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी पाहा गुलमोहर मधील पुढील कथा सासू, सून आणि तो