मेट्रो-३: कुलाबा – वांद्रे – सीप्झ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशनच्या वतीने २०,९०० झाडांचे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात रोपण




वृक्षारोपण आणि ७ वर्ष झाडांची देखभाल याविषयी एमएमआरसी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान यांच्या मध्ये सामंजस्य करार
मुंबई - जून ६, २०१८: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एमएमआरसी २०,९00 वृक्षांचे रोपण आणि त्यांची ७ वर्ष देखभाल करणार, अशा सामंजस्य करारावर एमएमआरसी ने स्वाक्षरी केली. वृक्ष प्राधिकरणाने दिलेल्या परवानगीनुसार या वृक्षारोपणासाठी १९ हेक्टर्स जमीन वापरण्यात येईल. ही जमीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने निर्देशित केली आहे. एमएमआरसी चा हा उपक्रम संयुक्त सामाजिक दायित्व (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सीबिलिटी) अंतर्गत आहे. वृक्षतोडीची भरपाई म्हणून १०,४५० झाडे आणि सामाजिक दायित्वा अंतर्गत उर्वरित झाडे लावण्यात येतील. या उपक्रमासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अधिकाऱ्यांनी सर्व्हे करून मौजे: मालाड (मतंगड जवळ) आणि मौजे: आकुर्ली (दामू / भीमनगर) ही जमीन एमएमआरसी ला दिली आहे.
याविषयी बोलताना एमएमआरसी च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती अश्विनी भिडे म्हणाल्या, वृक्षारोपणाचा हा स्तुत्य उपक्रम आम्हाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासोबत राबवता येतोय, याचा आम्हाला आनंद आहे. १ वृक्षतोड केल्यास ३ रोपट्यांची लागवड करणं वृक्ष प्राधिकरणाच्या नियमानुसार अपरिहार्य आहे. पण एमएमआरसी त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात वृक्षारोपण करणार आहे, हे इथे नमूद करणं आवश्यक आहे". एमएमआरसी ने या उपक्रमाची केवळ आर्थिक जबाबदारीच उचलली नसून   वृक्षारोपणाचं संपूर्ण काम काळजीपूर्वक होईल याकडे विशेष लक्ष दिलं आहे. तसंच वेळोवेळी मिळणाऱ्या वृक्ष प्राधिकरण्याच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येणार आहे, असंही श्रीमती अश्विनी भिडे पुढे म्हणाल्या.
आकाशनीम, बेल, चाफा, जंगली बदाम, साग, सप्तरंगी, सिंगापूर चेरी, तमन आणि उंदी या देशी प्रजातींबरोबरच इतर प्रजातींची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि एमएमआरसी च्या संबंधित अधिकाऱ्यांनी वेळोवेळी पाहणी करून या उपक्रमाची व्यवहार्यता तपासली आहे. आतापर्यंत वृक्षरोपणासाठी ५००० खड्डे खोदण्यात आले असून जून महिन्याच्या अखेरीस या अनोख्या उपक्रमाची श्रीगणेशा होईल.

Subscribe to receive free email updates: