मराठी नववर्ष म्हणजेच गुढी पाडव्याचा सण. मराठी मालिका व नाट्य-चित्रसृष्टीतील कलाकारांसाठीही हा सण खास असतो. आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकणारा अभिनेता संग्राम समेळसाठी यंदाचा गुढीपाडवा खास आहे. संग्रामचा लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असून नायकाची भूमिका असलेला त्याचा पहिलावहिला चित्रपट ‘ब्रेव्हहार्ट जिद्द जगण्याची’ येत्या ७ एप्रिलला प्रदर्शित होत आहे.
नात्यांची सुरेख सांगड घालत प्रेमाचा, विश्वासाचा, जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा हा सण प्रत्येकासाठी खास असतो. ‘निखिल फिल्म्स’प्रस्तुत ‘ब्रेव्हहार्ट’ या चित्रपटातही माणुसकीचे दर्शन घडत वडिल मुलाच्या नात्याचे अनोखे बंध उलगडणार आहेत. आपल्या या पहिल्या चित्रपटासाठी व पाडव्यासाठी संग्राम उत्सुक असून, ‘आनंद द्विगुणित करत जगण्याचा अर्थ उलगडून दाखवणारा नववर्षाचा सण व नात्यांचा ऋणानुबंध जपत जगणं शिकवणारा हा चित्रपट माझ्यासाठी तितकाच म्हत्त्वाचं असल्याचं’ संग्रामने या निमित्ताने सांगितलं. ७ एप्रिलला प्रदर्शित होणारा ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपट प्रत्येकाने सिनेमागृहात जाऊन अवश्य पाहवा’, असं सांगत संग्रामनेनववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.