‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ चित्रपटांचा मुहूर्त संपन्न

सध्या मराठी चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण विषय हाताळले जातायेत. काही चित्रपट सामाजिक परिस्थितीवर विनोदी पद्धतीने प्रहार करतात तर काही गंभीर भाष्य करत डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. चांगल्या मराठी चित्रपटांच्या निर्मितीसाठी अलीकडच्या काळात अनेक निर्मिती संस्था पुढाकार घेत आहेत. अप्सरा मिडिया एंटरटेन्मेंट नेटवर्क ही चित्रनिर्मिती संस्था ‘डब्बा गुल्ल’ व ‘स्वाभिमान’ या दोन मराठी चित्रपटांची निर्मिती करीत असून या चित्रपटांचा मुहूर्त ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्या हस्ते नुकताच करण्यात आला. या दोन्ही चित्रपटांतून सामाजिक सद्यस्थितीवर प्रकाशझोत टाकण्यात येणार आहे. या चित्रपटांचे दिग्दर्शन रोहित आर्या करणार आहेत.

याप्रसंगी बोलताना अभिनेते रमेश देव म्हणाले की, ‘रोहित’ जे काम करतो ते चांगलंच असतं त्यामुळे त्याला माझा नेहमीच पाठिंबा असतो. या दोन्ही चित्रपटांमधून चांगले व आजचे विषय प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न त्यांनी केला असून त्याच्या या प्रयत्नाला माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा आहेत’. या शुभेच्छांचा स्वीकार करीत, ‘देवांचा’ पाठिंबा माझ्यासोबत असेल तर हे चित्रपट नक्कीच यश संपादन करतील असा विश्वास दिग्दर्शक रोहित आर्या यांनी व्यक्त केला. अभिनेते विजय कदम यांनी ही याप्रसंगी उपस्थित रहात या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या

स्वच्छता अभियानाअंतर्गत आज विविध कंपन्या ठिकठिकाणी स्वच्छतागृहांची उभारणी करीत असल्या तरी त्यातही अनागोंदी आहे. या उभारणीत अनेकांचे हितसंबंध गुंतल्याने होणारे गोंधळ व सामान्यांची होणारी पंचाईत यावर डब्बा गुल्ल हा सिनेमा विनोदी पद्धतीने भाष्य करतो. तर स्वाभिमान चित्रपटाच्या कथेतून सिद्धांत व तत्वांची लढाई दाखवण्यात येणार आहे. कुटुंब व समाज यातील नातेसंबंधावर चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे.

मनोरंजनासोबत परिवर्तनाचा प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या या दोन्ही चित्रपटांचे चित्रीकरण ऑक्टोबरपासून सुरु होणार आहे. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकारांसोबत नवोदित चेहऱ्यांना ही संधी देण्यात येणार आहे. नव्या उदयोन्मुख चेहऱ्यांसाठी अप्सरा मिडिया संपूर्ण महाराष्ट्र दौरा करणार आहे. समाजातील वास्तवदर्शी घटनांचे चित्र मांडणाऱ्या या चित्रपटाची कथा–पटकथा-संवाद रोहित आर्या यांचे आहेत. प्रशांत हेडाऊ व अखिल माथूर यांनी लिहिलेली गीते प्रशांत हेडाऊ, साई–पियुष संगीतबद्ध करतील. चित्रपटाचे संकलन सचिन कौशिक करणार आहेत.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :