फक्त मराठी वाहिनीवर रंगणार कीर्तनाचा सोहळा
‘जे जे आपणासी ठावे ते ते लोकांशी सांगावे’ या उक्तीने आजवर असंख्य कीर्तनकारांनी निरुपणाच्या माध्यमातून ज्ञानाचा दीप समाजमनात लावण्याचा प्रयत्न केला आहे. काव्य, संगीत, अभिनय व नृत्य यातून साकारणाऱ्या भक्तिरसपूर्ण कीर्तनाची मोठी परंपरा महाराष्ट्रात आहे. ही परंपरा जोपासली जावी, भविष्याच्या दृष्टीनेही तिचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने फक्त मराठी वाहिनीने पुढाकार घेत देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी हा कीर्तनावर आधारित कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. लोकरंजनाने दिवसाची मंगलमय सुरुवात करणारा देवाचिया द्वारी कीर्तनाची वारी प्रेक्षकांना घरबसल्या पहाता येणार आहे. ६ फेब्रुवारीपासून दररोज सोमवार ते रविवार सकाळी ७.३० ते ८.३० तसेच संध्याकाळी ६.०० ते ७.०० या वेळेत देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाचे प्रसारण केले जाणार आहे. या कार्यक्रमातून विविध विषयांवर अनेक कीर्तनकार कीर्तनाच्या माध्यमातून निरुपण करणार आहेत.
देवाचिये द्वारी कीर्तनाची वारी या कार्यक्रमाबाबत बोलताना फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात की, फक्त मराठी वाहिनीने प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकपसंतीचा विचार केला आहे. धकाधकीच्या दिनचर्येमुळे प्रत्येकवेळी बाहेर जाऊन कार्यक्रमांचा आस्वाद घेणं प्रत्येकाला शक्य होत नाही. अशा प्रेक्षकांचा विचार करून कीर्तनाचा आस्वाद प्रेक्षकांना घरातच घेता यावा या उद्देशाने या कार्यक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. हा कार्यक्रम सकाळच्या प्रहरी प्रेक्षकांना मन:शांतीचा अनुभव देणारा ठरेल.