राम-लक्ष्मण या प्रसिद्ध संगीतकार जोडीने अनेक पिढय़ांचे मनोरंजन केलं आहे; त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अनेक रचना अतिशय लोकप्रिय ठरल्या आहेत. त्यांच्या संगीताची जादू आता रसिकांना ‘अॅट्रॉसिटी’ या आगामी मराठी चित्रपटाच्या निमित्ताने अनुभवता येणार आहे. या चित्रपटाला त्यांच्याच संगीताचा वारसा लाभला आहे. राम-लक्ष्मण या जोडीतील लक्ष्मण यांचे पुत्र अमर राम-लक्ष्मण यांच्या सुमधुर चालीने यातील गीते संगीतबद्ध झाली आहेत. आर. पी. प्रोडक्शनची निर्मिती असलेला हा चित्रपट २३ फेब्रुवारीला रसिकांच्या भेटीला येणार आहे. डॉ राजेंद्र पडोळे या चित्रपटाचे निर्माते असून दिग्दर्शन दिपक कदम यांचे आहे.
‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटातील गीते रसिकांच्या मनात रुंजी घालतील असा विश्वास व्यक्त करतान राम-लक्ष्मण यांचा सांगीतिक ठेवा जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला असल्याचे संगीतकार अमर राम-लक्ष्मण सांगतात. गीतकार अनंत जाधव, मंदार चोळकर, अखिल जोशी, विजय के. पाटील यांनी‘अॅट्रॉसिटी’मधील गीतं लिहिली असून, संगीतकार अमर राम-लक्ष्मण यांनी त्यावर सुरेख संगीतसाज चढवला आहे. आनंदी जोशी, वैशाली सामंत, जान्हवी प्रभू-अरोरा, शशिकांत मुंबारे, नंदेश उमप, सौरभ पी. श्रीवास्तव या गायकांनी या गीतरचना गायल्या आहेत. अनिल सुतार आणि जास्मिन ओझा यांनी गाण्यांची कोरिओग्राफी केली आहे.
ऋषभ पडोळे आणि पूजा जैसवाल या नव्या जोडीसोबत या चित्रपटात यतिन कार्येकर, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, लेखा राणे, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे, निखील चव्हाण हे कलाकार आहेत. राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी या चित्रपटाची पटकथा-संवाद लिहिले आहेत. राजेश राठोड यांनी या चित्रपटाचे छायांकन केले असून संकलनाचं काम विनोद चौरसिया यांनी केले आहे. मधू कांबळे यांनी कला दिग्दर्शन केले आहे. २३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ प्रदर्शित होणार आहे.