छोट्या पडद्यावरील अनेक चेहरे मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज असताना छोट्या पडद्यावरील एक ओळखीचा चेहरा मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. ‘लागीर झालं जी’ फेम निखिल चव्हाण लवकरच मोठ्या पडद्यावर येतोय. आर.पी. प्रॉडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’ या चित्रपटातून निखिल मोठ्या पडद्यावर पदार्पण करतोय. २३ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘लागीर झालं जी’ मधील साधा भोळा विक्या त्याच्या आगामी ‘अॅट्रॉसिटी’ चित्रपटात खलनायकी भूमिकेत दिसणार आहे. यात मनीष चौधरी ही व्यक्तिरेखा साकारतो आहे. मोठ्या पडद्यावर येण्यास सज्ज झालेला निखिल सांगतो, या चित्रपटामध्ये काम करण्याचा माझा अनुभव कमालीचा आहे. मोठ्या पडद्यावर पदार्पण करण्यासाठी एका चांगल्या भूमिकेच्या शोधात होतो. उत्तम कथानक असलेल्या ‘अॅट्रॉसिटी’च्या निमित्ताने मला चांगली भूमिका मिळाली असून या चित्रपपटाबाबत मी खूप उत्सुक आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ. राजेंद्र पडोळे तर दिग्दर्शक दिपक कदम आहेत.
या चित्रपटात निखील सोबत ऋषभ पडोळे, पूजा जैस्वाल ही नवोदित जोडी तसेच यतिन कार्येकर, लेखा राणे, गणेश यादव, विजय कदम, सुरेखा कुडची, डॉ. निशिगंधा वाड, कमलेश सुर्वे, राजू मोरे, ज्योती पाटील, शैलेश धनावडे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटाची कथा संकल्पना डॉ. राजेंद्र पडोळे यांची असून राजन सुर्वे आणि मंगेश केदार यांनी पटकथा आणि संवादलेखन केले आहे. छायांकन राजेश सोमनाथ तर संकलन विनोद चौरसिया यांचे आहे. संगीत अमर रामलक्ष्मण यांचे आहे.
२३ फेब्रुवारीला ‘अॅट्रॉसिटी’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.