स्वप्नील-सुबोधच्या प्रेमाची बॅकस्टोरी सांगतोय 'फुगे' चा ट्रेलर

'फुगे' या सिनेमाच्या नावातच रंजकता असणाऱ्या या चित्रपटाला प्रदर्शनापूर्वीच मोठी प्रसिद्धी मिळत आहे. स्वप्नील जोशी आणि सुबोध भावे या मराठी सिनेजगतातील 'एस' फेक्टर्सना घेऊन बनलेल्या या सिनेमाचा शिवाजी मंदिर येथे नुकताच ट्रेलर लॉन्च करण्यात आला. सुबोध भावेच्या वाढदिवशी सादर झालेल्या या कार्यक्रमात मराठी सिनेवर्तुळातील अनेक नामवंत कलावंतांची नांदी देखील पाहायला मिळाली. मित्रांच्या विश्वात रमणाऱ्या आणि आजच्या बॅचलर तरुणांना आपलेसे करणाऱ्या या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चवेळी दस्तुरखुद्द बॉलिवूडचा हॅण्डसम हंक जॉन अब्राहमने उपस्थिती लावली होती. जॉनच्या आगमनामुळे या कार्यक्रमाला चारचाँद लागले. 
या कार्यक्रमात सेंटर ऑफ अट्रॅक्शन ठरलेला बर्थडे बॉय सुबोध भावेचा वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. लेखक म्हणून पहिल्यांदाच रसिकांसमोर येत असताना, 'फुगे' सिनेमाचा ट्रेलर लॉन्च होणे माझ्यासाठी मोठी पर्वणीच असल्याचे सुबोध म्हणाला. मी आणि स्वप्नीलने या सिनेमाची कथा लिहिली असून आम्ही प्रथमच मोठ्या पडद्यावर एकत्र येणार असल्यामुळे या सिनेमाबाबत मी खूप उत्सुक असल्याचे सुबोधने पुढे सांगितले. तसेच स्वप्नीलने देखील सुबोधसोबत काम करताना मोठी मजा आली असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती लावणाऱ्या जॉन अब्राहमने 'फुगे' सिनेमाला भरपूर शुभेच्छा दिल्या. 'स्वप्ना वाघमारे जोशी हि माझी चांगली मैत्रीण असून, आतापर्यंत केलेल्या चित्रपटातून ती एक चांगली दिग्दर्शिका असल्याचे तिने सिद्ध केले आहे. मराठी सिनेमाची व्याप्ती मोठी आहे, सिनेमाची कथा आणि त्याची बांधणी मराठीचे सिनेमाचा कणा आहे, त्यामुळे भविष्यात मी स्वप्नासोबत मराठीत काम करण्याचा विचार देखील करू शकतो' अशी जॉनने सिनेमाला पोचपावती दिली.    
दोन बालमित्र... त्यांच्यातली मैत्री... आणि अचानक येणारा ट्विस्ट! असे बरेच काही या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळत आहे.  सिनेमातील पोस्टरच्या रंगबेरंगी फुग्यांप्रमाणे या सिनेमाचा ट्रेलर देखील कलरफुल आहे. ज्यात एका बाजूला दोन मित्रांची दोस्ती आहे तर दुसरीकडे हळूच फुलणारी लव्हस्टोरी देखील आहे. रोमँटिक आणि तेवढीच कॉमेडी जॉनरने परिपूर्ण असलेल्या या ट्रेलरमध्ये नयनरम्य असा गोवाचा समुद्रकिनारा देखील पाहायला मिळतो. एस टीव्ही नेटवर्क्ससोबत जीसिम्सचे अर्जुनसिंग बऱ्हान, कार्तिक निशानदार तसेच अश्विन आंचन आणि अनुराधा जोशी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट स्वप्ना वाघमारे जोशी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकार झाला आहे. महत्वाची बाब म्हणजे चित्रपट निर्मितीबरोबरच सिनेमा रसिकांपर्यंत कसा पोहोचेल याची अचूक जाण जीसिम्सचे कार्तिक -अर्जुन या जोडीला आहे. तसेच प्रसाद भेंडे यांच्या केमेऱ्यात शूट झालेल्या या सिनेमाचे संकलम क्षितिजा खंडागळे यांनी केले आहे. इंदर राज कपूर यांची [प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे लेखन स्वप्नील- सुबोध यांनीच केले असून हेमंत ढोमे आणि अभिजित गुरु यांनी या सिनेमाची पटकथा लिहिली आहे. रोचक कोहली, अमित राज आणि निलेश मोहरीड यांचे संगीत 'फुगे' या सिनेमात प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.  स्वप्नील आणि सुबोध बरोबरच यात प्रार्थना बेहेरे ही अभिनेत्रीदेखील प्रमुख भूमिकेत असणार आहे. शिवाय सुहास जोशी, मोहन जोशी, आनंद इंगळे आणि नीता शेट्टी हे देखील आपापल्या भूमिकेत दिसतील. प्रेमाची हटके बॅकस्टोरी सांगणारा हा सिनेमा २ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होईल. 

Subscribe to receive free email updates: