गुढीपाडवा म्हणजे नववर्षाचा आरंभदिन. या आरंभदिनाच्या पूर्वसंध्येला एकमेकांना चिरायू म्हणत खास मराठी ढंगात नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी मराठी कलाकार दरवर्षी एकत्र येत चिरायू दणक्यात साजरा करतात. यंदाही चिरायू म्हणत कलात्मक सृजनतेची गुढी उभारत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी चिरायूला आवर्जून उपस्थिती लावली.
पडद्यावरील कलाकर्मीची दखल सारेचजण घेतात पण पडद्यामागे काम करणाऱ्या कलाकर्मीची दखल फारशी घेतली जात नाही. या कलाकर्मींची दखल घेत त्यांचा सत्कार व्हावा अशी संकल्पना अभिनेता सुशांत शेलार यांनी मांडली आणि इतर कलाकारांच्या सहकार्याने ती प्रत्यक्षात उतरवली. मराठी चित्रपटसृष्टीसाठी योगदान देणाऱ्या पडद्यामागच्या अशाच दादांचा सन्मान चिरायूतर्फे यंदाच्या वर्षी करण्यात आला. तसेच ‘दादा’ पुरस्काराने यावेळी त्यांना सन्मानित करण्यात आले. पुरस्कारप्राप्त कलाकर्मीची नावे पुढीलप्रमाणे आहेत. विजय भोपे (साऊंड रेकॉर्डीस्ट), शिवाजी कारले (लाईट दादा), रमाकांत मालपेकर (नृत्य कलाकार), आशा मालपेकर (ड्रेसमन), कृष्णा तोरस्कर (भोजन) दत्ताराम शेलार (सेटिंग दादा), मोहम्मद भाई (स्पॉट दादा), दादा गोडकर (निर्मिती व्यवस्था)
चिरायूचे स्वरूप उत्सवी न राहता चिरायूच्या माध्यमातून अनेक चांगले उपक्रम मराठी चित्रपटसृष्टीसाठी राबवण्याचा मानस अभिनेता सुशांत शेलार व इतर कलाकारांनी यावेळी व्यक्त केला. श्रीरंग गोडबोले व अक्षय बर्द्रापूरकर यांचे मोलाचे सहकार्य या सोहळ्यास लाभले. दिमाखदारपणे संपन्न झालेला हा सोहळा चांगलाच रंगला.