रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस यांची निर्मिती असलेला ‘राजन’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांसमोर येत आहे. भरत सुनंदा दिग्दर्शित आणि लिखित या सिनेमाच्या ‘राजन’ ह्या शीर्षकामुळे अनेक तर्क-वितर्क लावले जात आहे. मुंबईत होत असलेल्या या सिनेमाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले असून, हा सिनेमा नेमका कशावर आधारित आहे, हे लवकरच लोकांना समजणार आहे. असे असले तरी, या सिनेमाच्या शीर्षकावरून हा सिनेमा ९० च्या दशकात मुंबईत राज्य करणारा ‘छोटा राजन’ वर आधारित असल्याचे बोलले जात आहे. तुर्तास, याबाबत कोणतीच अधिकृत बातमी समोर आली नसली तरी, या सिनेमाच्या टिजर पोस्टरचा आवाज सोशल साईटवर ऐकायला मिळत आहे. या सिनेमाच्या पहिल्या टिजर पोस्टरवर पोलीस कोठडीचे चित्र दिसत असून, नुकतेच प्रदर्शित झालेल्या दुसया पोस्टरवर 'वॉन्टेड' या अद्याक्षराच्या खाली सिहांची प्रतिकृती दिसत असल्यामुळे, हा सिनेमा तत्कालीन मुंबईतील गुंडगिरीवर भाष्य करणारा आहे, असा अंदाज येतो.
‘राजन’ या सिनेमाचे सुरेखा पाटील, दिप्ती बनसोडे आणि वामन पाटील यांनी निर्मिती केली असून, तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. या सिनेमातील स्टारकास्टबाबत सध्या गुप्तता पाळण्यात आली असून, लवकरच मराठीच्या सिल्व्हर स्क्रिनवरचा हा ‘राजन’ नेमका कोण, हे सर्वांसमोर येणार आहे. आगामी ‘राजन’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित होत असलेल्या मराठी सिनेमांच्या यादीत एक नवा थरार घेऊन येईल, हे नक्की!