ठाई ठाई माझी विठाई...

आषाढवारीचा सोहळा न भरात आला असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. आली आषाढी एकादशी...चला करू पंढरीची वारी...माझी विठ्ठल रखुमाई! असं म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांसाठी ही वारी म्हणजे आत्मानंदाचा अनुभव असतो. हाच अनुभव विठ्ठला शप्पथ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घ्यायची संधी मिळणार आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
विठ्ठला शप्पथ या चित्रपटाची कथापटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवादलेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे, गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील भक्तीगीत नुकतंच ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे.
झळही नसे मज तापल्या उन्हाची... घरकुल सावरी सावली कुणाची
म्हणे तुका नामा जनाई... ठाई ठाई माझी विठाई... 
मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला चिनार-महेश यांचा संगीतसाज लाभला आहे. ‘व्हिडिओ पॅलेस ही म्युझिक कंपनी या चित्रपटातीलगाणी प्रकाशित करणार आहे.
माळ तुळशीची टिळा चंदनाचा भाळी... शिणला हा देह जरी थकली ना टाळी
सोडवून सारी अंधाळाची जाळी... दिस नवा येई तुझी ऐकण्या भूपाळी
आभाळाला देई निळाई... ठाई ठाई माझी विठाई... 
अशा अतिशय समर्पक शब्दात विठ्ठल भक्तीचं यथार्थ वर्णन करणारे हे गीत सगळ्यांनाच समाधानाची अनुभूती देईल.

Subscribe to receive free email updates:

Related Posts :