परदेशी उद्योजकांचे स्वागत करण्यासाठी कोकण सज्ज

कोकणचे सौंदर्य केरळ पेक्षा तसूभरही कमी नाही. परंतु केरळच्या तुलनेत कोकणात येणा-या पर्यटकांची संख्या खूपच कमी आहे. ही परीस्थिती बदलण्यासाठी जगातील ५० देशांतील उद्योजकांना ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ च्या निमित्ताने मुंबईत आणण्यात येणार आहे. सहारा स्टार हॉटेलमध्ये होणा-या दोन दिवसांच्या कार्यक्रमात हे उद्योजक विविध विषयांवर आयोजित परीसंवादात सहभागी होतील, तसेच परदेशातून येणा-या उद्योजकांसोबत, भारतातून आलेल्या गुंतवणूकदारांसोबत व्यावसायिक चर्चाही करतील. २१ मे रोजी कोकणातील उद्योजकांसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ डॉ. प्रेम जग्यासि यांच्या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कोकण कॉन्क्लेव्ह’ चे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार असून केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री के.जे. अल्फोन्स, आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल, बंदरे-नौकानयन राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, अतुल भातखळकर, आमदार अमित साटम,‘मसाला किंग’ धनंजय दातार आणि विविध विषयांचे तज्ज्ञ या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.
परदेशी उद्योजकांचा कोकण दौरा
दुस-या दिवशी वर्कशॉपनंतर परदेशातून आलेले उद्योजक २१ मे रोजी रायगड, २२ मे रोजी रत्नागिरी आणि २३ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या भेटीवर जाणार आहेत. या भेटीत परदेशी पाहूणे कोकणातील काही देखणे समुद्र किनारे, बॅक वॉटर, मंदीरे, गड किल्ल्यांची सफर करून कोकणाच्या सौंदर्याचा आस्वाद घेणार आहेत. चिपळूण येथील बॅक वॉटर, गणपतीपुळे, थिबा पॅलेस, विजयदुर्गचा किल्ला, कुणकेश्वर मंदीर अशा पर्यटन स्थळांना भेट अपेक्षित आहे. काही काजू कारखाने, आमरस कारखाने आणि अन्य काही प्रकल्पांना भेट देण्यात येणार आहे. २४ मे रोजी परदेशी पाहूणे आपआपल्या देशात रवाना होणार आहेत. रीव्हर्स एण्ड माऊंटसने या उपक्रमाचे आयोजन केले असून कोकणातील अनेक सामाजिक संस्थांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले आहे. परदेशातील पर्यटन क्षेत्रातील दिग्गजांनी कोकणच्या पर्यटनस्थळांना भेट दिल्यामुळे या क्षेत्रातील पर्य़टनाला उत्तम चालना मिळार असून अन्न प्रक्रीया उद्योगातील लोकांनाही जागतिक पातळीवरील उद्योगांशी थेट संपर्क साधण्याची संधी मिळणार असल्याची माहिती कार्यक्रमाचे आयोजक दिनेश कानजी आणि समीर गुरव यांनी दिली.