चित्रपटाच्या यशात त्यातल्या गीतांचे, त्याच्या संगीताचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांना क्लिक झाली तर चित्रपट आपोआप प्रेक्षकांपर्यंत पोहचतो हे लक्षात घेवूनच ‘What’s up लग्न’ या चित्रपटाच्या टीमने ३ महिने आधीच गाणे प्रदर्शित करण्याचा व त्याच्या प्रसिद्धीतही वेगळेपणा जपण्याचा प्रयत्न आवर्जून केला आहे. या चित्रपटातील एक हृद्यस्पर्शी गाणं मराठीतले आतापर्यंतचे सर्वात भव्य व दर्जेदार गाणे ठरणार आहे. या गीतासाठी वेगळा प्रमोशनल फंडा वापरला आहे.
व्हिडिओ पॅलेसच्या नानूभाई जयसिंघानी यांनी ‘What’s up लग्न’ चित्रपटातील या गाण्यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. व्हिडिओ पॅलेसच्या दुनियादारी, क्लासमेट,मितवा, हाफ तिकीट या चित्रपटातील गाण्यांच्या लोकप्रियतेवरून याची सहजी कल्पना यावी. चार वर्षापूर्वी संगीतकार ट्रॅाय–आरिफ या संगीतकार जोडीने नानूभाई यांना एक ट्यून ऐकवली. ही ट्यून ऐकताच क्षणी त्यांना आवडली आणि त्यातून ‘तुझ्या आठवणींचे गंध सारे आणतो मी’ ‘जुन्या इंद्रधनुचे रंग सारे आणतो मी’ हे हृदयस्पर्शी गाणं साकारलं. ऐकायला आणि पहायला नेत्रसुखद असणाऱ्या या गाण्याच्या निर्मितीसाठी व्हिडिओ पॅलेसचे नानूभाई जयसिंघानी व चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी यांनी बरीच मेहनत केली आहे.
‘डान्स प्लस’ या गाजलेल्या रिअॅलिटी शोमधील पल्लवी शिंपी आणि ऋषभ खडतले ही जोडी या गाण्यासाठी निवडली गेली. फुलवा खामकर यांच्या नृत्यदिग्दर्शनाखाली या गाण्यावर ‘सेन्शुअस कंटेम्परी डान्स स्टाईल’ कोरिओग्राफ केली आहे. या गाण्याची खासियत म्हणजे २४ बाय २४ फीट एवढ्या मोठ्या पाण्याचा सेटवर चित्रित करण्यात आलेलं हे गाणं अतिशय थंड वातावरणात पल्लवी व ऋषभ यांनी हटके अंदाजात सादर केलं आहे. सातत्याने सहा दिवसाची रिहर्सल या गाण्यासाठी या दोघांनी केली. गाण्याच्या चित्रिकरणादरम्यान पल्लवीच्या पायाला जबर दुखापत झाली असतानाही तिने या गाण्याचं शूट पूर्ण केलं. गाण्यासाठी प्रथमच ३ कॅमेरा सेटअप वापरत संपूर्ण गीत पाण्यात शूट करण्याचा अनोखा प्रयोग मराठीत झाला आहे. व्हिज्युली हे गाणं प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहचावं यासाठी व्हीएफक्स वरसुद्धा महिनाभर काम करण्यात आले आहे. कॉंस्च्युमपासून ते कलादिग्दर्शनापर्यंत प्रत्येक गोष्टीचा या गाण्यासाठी बारकाईने विचार करण्यात आला आहे.
या गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून ट्रॅाय–आरिफ यांनी ते संगीतबद्ध केले आहे. ऋषीकेश रानडे यांनी हे गाणं गायलं आहे. या गाण्यासाठी कसलेल्या आवाजाची गरज लक्षात घेत ऋषीकेश रानडे यांची निवड करण्यात आली. किरण जयसिंघानी यांनी कॉंस्च्युमची जबाबदारी तर छायांकनाची जबाबदारी पुष्पांक गावडे यांनी सांभाळली. कलादिग्दर्शन महेश साळगावकर यांनी केले आहे. या गाण्याचा आस्वाद प्रेक्षकांना शनिवारी १७ फेब्रुवारी (आज) सर्व म्युझिक चॅनल्स व व्हिडिओ पॅलेसच्या युट्युब चॅनलवर घेता येईल. हे अनोखे आणि तितकेच लक्षवेधी गाणे प्रेक्षकांचं मनं जिंकेल यात शंका नाही.
फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. अभिनेता वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहेरे या हिट जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस हे चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट १६ मार्चला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.