प्रेक्षकांना घालणार 'बावरीसाद'


v 'युवती म्युझिककंपनीचं पहिलं पुष्प रसिकदरबारी!
v तरूण कलाकारांना देणार हक्काचं व्यासपीठ!
नव्या पिढीच्या संगीतकार, गायकांना हक्काचं व्यासपीठ देण्यासाठी 'युवती म्युझिक' कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. 'बावरी साद' या गाण्याद्वारे ही कंपनी संगीत क्षेत्रात पदार्पण करत असून, त्यांचा हा पहिला वहिला म्युझिक व्हिडिओ आज मुंबईच्या प्लाझा चित्रपटगृहात अनोख्या धर्तीवर लाँच करण्यात आला.
गेल्या काही काळात मराठी गाण्यांची लोकप्रियता सातत्याने वाढते आहे. मात्र, यातील बहुतांश गाणी चित्रपटातील आहेत. म्युझिक व्हिडिओ, अल्बमच्या निर्मितीचे प्रमाण पूर्णतः घटले आहे. निर्मितीचा खर्च अवाढव्य झाला असताना रसिक मात्र सीडी खरेदी करण्याऐवजी डाऊनलोड करण्याला प्राधान्य देत आहेत. असे असताना या काळात केवळ उत्तम गाणी, संगीत निर्मिती आणि तरूण कलाकारांना डोळ्यासमोर ठेवून प्रमोद वाघमारे यांनी 'युवती म्युझिक'ची स्थापना केली आहे. आताच्या काळात त्यांचा हा प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. नव्या पिढीच्या नव्या जाणिवांचं संगीत रसिकांपुढे आणण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
'बावरी साद' या प्रेम गीतातून एक कथा उलगडणार आहे. शिक्षणासाठी परदेशी जाणारी एक मुलगी आणि तिचा प्रियकर यांच्यातील हळुवार नात्याचा वेध घेण्यात आला आहे. परदेशी जाण्याच्या विचाराने होणाऱ्या विरहानं ती मुलगी सैरभैर झाली आहे. त्या दोघांमधील नात्याचं काय होतं याचं चित्रण हा म्युझिक व्हिडिओ करतो. शलाका देशपांडे यांनी लिहिलेल्या या गाण्याला नीतेश मोरे यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्यातून नव्या दमाचे गीतकार आणि संगीतकार रसिकांपुढे येत आहेत. म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन रिशव अगरवाल, चित्रीकरण मयुर बराधे यांनी केलं आहे. आताचे आघाडीचे गायक मंगेश बोरगावकर, कीर्ती किल्लेदार यांनी हे गाणं गायलं आहे. वेगळ्या स्टाईलचं हे प्रेमगीत तरुणांमध्ये धडधड वाढवणारं असून 'युवती म्युझिक'च्या नावाला साजेसं ठरलं आहे.
'मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या कलाकारांना स्वबळावर कलाकृती निर्माण करणं शक्य नसतं. हे पाठबळ देण्याचं काम 'युवती म्युझिक' करत आहे. त्याच्या पाठबळानेच माझं पहिलं गाणं सादर होत आहे. करिअर उभं राहण्यासाठी, आत्मविश्वास येण्यासाठी अशी संधी मिळणं आवश्यक असतं. युवती संगीत हीच संधी नव्या दमाच्या कलाकारांना देणार आहे. नव्या कलाकारांसाठी हा महत्त्वाचा मंच ठरेल,' असं संगीतकार नीतेश मोरे यांनी सांगितलं.
'केवळ उत्तम दर्जाचं संगीत आणि नवे कलाकार प्रेक्षकांपुढे आणण्याच्या विचारातून 'युवती म्युझिक'ची स्थापना झाली. नवे गीतकार, संगीतकार, गायकांनी त्यांची गीतं आणि रचना आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात. त्याची चाचणी घेऊन त्या कलाकारांना योग्य पद्धतीनं सादर करण्यात येणार आहे. कोणत्याही भाषेतल्या गाण्याची निर्मिती केली जाणार आहे. आताच्या पिढीचं संगीत, जाणीवा वेगळ्या आहेत. त्यांना चांगला मंच उपलब्ध करून देण्याची गरज आहे. 'युवती म्युझिक' ही गरज पूर्ण करणार आहे,' असं प्रमोद वाघमारे यांनी सांगितलं.

Subscribe to receive free email updates: