प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स ह्या निर्मिती संस्थेची पहिली मराठी फिल्म व्हेंटिलेटर गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाली होती. डॉ.मधु चोप्रा निर्मित ह्या चित्रपटाला यंदाच्या पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात(PIFF) सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
व्हेंटिलेटर सिनेमाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर ह्यांनीच ह्या सिनेमाच्या पटकथेवरही काम केलं होतं. ह्या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटात मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काम केलं आहे. आशुतोष गोवारीकर आणि बमन इराणी ह्यांच्याही सिनेमात मुख्य भुमिका आहेत.
कौटुंबिक मूल्ये, प्रथा, परंपरा आणि नातेसंबंध ह्यावर व्हेंटिलेटर सिनेमाने प्राकाशझोत टाकला होता. सिनेमाचं रसिकांनी भरभरून कौतुक होते. यावर्षी जानेवारीमध्ये चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर झाला होता.
चित्रपटाच्या निर्मात्या मधू चोप्रा म्हणतात, “व्हेंटिलेटर सिनेमाशी निगडीत प्रत्येकाचा हा सन्मान आहे. ह्या सिनेमाचा विषय माझ्या हृदयाला भिडला. सिनेमाचा विषय प्रियंका, राजेश आणि आम्हां सगंळ्यानाच खुप भावला होता. ह्या चित्रपटाची निवड न्युयॉर्क चित्रपट महोत्सवासाठीही झालीय.”
राजेश मापुस्कर ह्या पुरस्काराविषयी प्रतिक्रिय़ा देताना म्हणाले, “ पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेल्या सर्वोत्कृष्ठ पटकथेचा हा पुरस्कार माझा पहिला पुरस्कार आहे. मला अतिशय अभिमान वाटतो, की आमच्या पटकथेला हा पुरस्कार मिळाला. माझ्या लेखनाचं कौतुक झाल्याचा हा अभिमान आहे. व्हेंटिलेटर चित्रपटाची टिम आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा हा सन्मान आहे.”