मुंबई, १० फेब्रुवारी २०१७ : कलर्स मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या गणपती बाप्पा मोरया ह्या मालिकेच्या कथानकाला आता एक वेगळीच दिशा मिळणार आहे. पार्वतीचं मन प्रफुल्लित करण्यासाठी महादेव तिने व्यक्त केलेल्या एका अटीची पूर्तता करायला सहा ऋतूमध्ये जाऊन, त्या त्या ऋतूतली फुलं वेचून त्यांचा गजरा आपल्या प्रिय पत्नी साठी आणायचं मान्य करतात. पण दुर्दैवाने त्यांना त्यात यश मिळत नाही आणि पार्वती आपल्या सर्व शक्तींचा त्याग करून स्मृती रूपात तिच्या गतजन्मात जाते. कित्येक युगं मागे, तिच्या सती जन्मात. आणि सुरू होते दक्षकन्या सती आणि महादेवांची कथा. सती जिच्या मनात ओंकार रूपी गणेश महादेवांच्या प्रितीची भावना जागी करतो, वेळोवेळी सतीला तिच्या आणि महादेवांच्या अलौकिक नात्याची प्रचिती देतो. आणि महादेव द्वेष्ट्या दक्षचा विरोध पत्करून सती आणि महादेवांचं मिलन घडवून आणतो.दक्षाच्या अहंकार आणि महादेव द्वेषाचे परिणाम अखेरीस सतीने आत्मतेजाने स्वतःला भस्म करून घेण्यात होतात. तेव्हा ओंकार रूपी गणेश सतीला वरदान देतो की तिच्या पुढील जन्मात तिचं आणि महादेवांचं मिलन होईल आणि तेव्हा ओंकार त्या जन्मात पार्वतीचा पुत्र म्हणून ओळखला जाईल.
ओंकार रुपी गणेश पूर्व जन्मात गेलेल्या पार्वतीला सगळ्या गोष्टींचं स्मरण करून देतो. ह्या प्रयत्नात ओंकारला यश मिळेल की निराशा?, शिव शक्तीच्या नात्याची पार्वतीला जाणीव होईल का? तिला वर्तमानात परत आणण्यासाठी ओंकार कसे प्रयत्न करेल. ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी पहा.. गणपती बाप्पा मोरया फक्त कलर्स मराठीवर.