अधिकारी बदलले कि, सूत्र देखील बदलतात. या बदलत्या सूत्रांचा परिणाम सामान्य नागरिकांवर आणि त्याबरोबरच शहरावर देखील होत असतो. राज्यात नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकांचे मोठे उदाहरण आपल्यासमोर आहे. खास करून मुंबई शहराच्या आर्थिक उलाढाली सांभाळणा-या बृहन्मुंबई महानगरपालिकेचे हे सूत्र अनेक काळापासून निरंतर सुरु आहे. नुकतीच विश्वनाथ महाडेश्वर यांची मुंबईच्या महापौरपदी नियुक्ती झाली असून, त्यांचा नवा कार्यकाल शहराला लागू होणार आहे. अधिकाराची ही खांदेपालट सामान्य जीवनात कशापद्धतीने परिणाम करते, याचे वास्तव 'ट्रकभर स्वप्न' या आगामी सिनेमात आपल्याला पाहायला मिळणार आहे.
अभिनेते, चित्रपट- कलादिग्दर्शक, दिग्दर्शक तसेच निर्माते असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेले नितीन चंद्रकांत देसाई लोकांना प्रत्येकवेळी काहीतरी वेगळे देण्याचा प्रयत्न करतात. असाच एक प्रयत्न त्यांनी 'ट्रकभर स्वप्न' या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे.
आयकॉनिक चंद्रकांत प्रॉडक्शन प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली सादर होणारा हा सिनेमा एका महत्वाकांक्षी तरुणाच्या जीवनावर भाष्य करतो.सरकारी खात्यातील बदलत्या नियमांची झळ सामान्य कुटुंबावर कशी पडते,यावर हा सिनेमा बेतला आहे. विशेष म्हणजे यात मकरंद देशपांडे प्रमुख भूमिकेत असून, क्रांती रेडकरची देखील एक महत्वपूर्ण व्यक्तिरेखा सिनेमात आहे. प्रमोद पवार दिग्दर्शित हा सिनेमा सामान्य मुंबईकरांच्या भावना आणि त्यांच्या महात्वाकांक्षेवर आधारित आहे. स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक सामान्य नागरिकांची हृदयस्पर्शी कथा मांडणारा हा कौटुंबिक सिनेमा लवकरच सर्वत्र प्रदर्शित होत आहे.