पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये झाला पोस्टर लाँच
गेले अनेक दिवस 'बॉईज' या सिनेमाच्या पोस्टरमधील त्या तीन 'बॉईज' बद्दल अनेक तर्कवितर्क लावले जात होते. या सिनेमाच्या टीजर पोस्टरवर पाठमोरी उभी असणारी ही तीन मुलं नेमकी कोण आहेत? या प्रश्नाला अखेर पूर्णविराम मिळाला. पुण्याच्या जेएसपीएम कॉलेजमध्ये नुकताच झालेल्या ‘बॉईज’च्या पोस्टर लाँच समारंभात याचा उलगडा झाला. ही तीन मुले म्हणजेच पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड असून, यांना पहिल्यांदाच सर्वांसमोर सादर करण्यात आले. या तिघांनी जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांचे चांगलेच मनोरंजन केले. विशेष म्हणजे, कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी देखील त्यांना पुरेपूर साथ देत, कार्यक्रम रंगात आणला. यात भरीस भर म्हणजे, 'बॉईज' सिनेमातील ‘जीवना...’हे गाणेदेखील याठिकाणी सादर करण्यात आले. चित्रपटामध्ये मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या सुमंत शिंदेवर आधारीत असलेले हे गाणं, जीवनाला नवी प्रेरणा देणारे ठरत आहे.
'बॉईज' सिनेमातील स्वप्नील बांदोडकरच्या आवाजातले आणि सिनेमात नसलेले अवधूतच्या आवाजातले असे दोन व्हर्जन 'जीवना...' गाण्याचे सादर करण्यात आले. दोघांच्याही या लाईव्ह गाण्याचा मनसोक्त आनंद जेएसपीएमच्या विद्यार्थ्यांनी पुरेपूर लुटला. तत्पूर्वी, या गाण्यांवरून स्वप्नील बांदोडकर आणि अवधूत गुप्तेमध्ये झालेला मतभेद देखील पाहायला मिळाला. स्वप्नीलला अवधूतचे तर अवधूतला स्वप्नीलचे व्हर्जन आवडत असल्यामुळे, त्याबद्दलचा अखेरचा निर्णय त्यांनी विद्यार्थ्यांवर सोडला. जे गाणे सर्वात जास्त लोकांना आवडेल तेच गाणे सिनेमात दाखवले जाईल, अशी घोषणादेखील स्वप्नीलने करत वातावरण तंग केले. विद्यार्थ्यांनी मात्र या दोन्ही व्हर्जनचा पुरेपूर आनंद लुटत, दोघांनाही समान मत दिले. तसेच पार्थ, सुमंत आणि प्रतिकसोबत त्यांनी गाण्यांवर ठेकादेखील धरला.
मन उल्हासित करून टाकणारे 'बॉईज' सिनेमातील हे गाणे वैभव जोशी यांनी लेहिले असून, या गाण्याचे संगीतदिग्दर्शन अवधूत गुप्ते यांनी केले आहे. शिवाय स्वप्नील बांदोडकरच्या सुरेल आवाज या गाण्याला लाभला आहे. या सिनेमाचा पोस्टर आजच्या तरुणाईचे खुमासदार मनोरंजन करणारे ठरत आहे.
यापूर्वी अनेक चित्रपटामधून लोकांसमोर आलेला पार्थ भालेराव यात झळकणार असून सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड या चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण करीत आहे.. किशोरवयीन मुलांचे भावविश्व मांडणाऱ्या या सिनेमाची निर्मिती, सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे यांनी केली असून, विशाल देवरुखकर या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. विशेष म्हणजे गायक अवधुत गुप्ते या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच प्रस्तुतकर्त्याच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहे. कम्प्लीट यूथ एंटरटेनिंग असणाऱ्या या सिनेमाच्या पोस्टरने प्रदर्शनापूर्वीच आजच्या तरुणाईच्या मनात अधिराज्य गाजवले असून, या चित्रपटात चक्क सनी लिओनीचा आयटम नंबर पहायला मिळणार असल्यामुळे, आजच्या ‘बॉई ज’ ना हा सिनेमा नक्कीच मोठी मेजवानी ठरणार आहे. येत्या यूथ फेस्टिवल महिन्यात प्रदर्शित होणारा हा सिनेमा रसिकांसाठी मोठी पर्वणीच ठरेल,हे नक्की.