लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’ च्या दर्शनासाठी मुंबईकरांबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात. नवसाला पावणाऱ्या बाप्पाचं मुखदर्शन व्हावं हे प्रत्येकाची इच्छा असते, पण ते प्रत्येकाला शक्य होतच असं नाही. ज्यांना प्रत्यक्ष दर्शन शक्य नाही अशा भक्तांसाठी फक्त मराठी चित्रपट वाहिनीने एक खास भेट आणली आहे.
शुक्रवार २५ ऑगस्ट गणेश चतुर्थी पासून ते मंगळवार ५ सप्टेंबर अनंत चतुर्दशी पर्यंत दररोज सायंकाळी ६.३० वाजता लालबागच्या राजाचे दर्शन आणि राजाची संपूर्ण आरती घरबसल्या पहायला मिळणार आहे. गणेशोत्सवाच्या दरम्यान गणपती बाप्पाशी संबधित अनेक नाविन्यपूर्ण कार्यक्रम सुद्धा पहायला मिळणार आहे. या विषयी बोलताना फक्त मराठी वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात की, मनोरंजनासोबत प्रेक्षकांची अभिरुची जपत अनेक कल्पक उपक्रम आम्ही आगामी प्रेक्षकांसाठी आणत आहोत. ‘लालबागचा राजा’ स्पेशल हा त्यातलाच एक प्रयत्न आहे.