युफोरिया प्रॉडक्शन्सची चाहूल कलर्स मराठीवर

 चाहूल 

मनोरंजन क्षेत्रात एक रोमांचकारी ‘चाहूल’ येऊ पाहत आहे. एक अपूर्ण प्रेमकहाणीची... एका अकल्पित घटनेच्या उमटणाऱ्या पडसादांची.. आणि अतृप्त इच्छांची ‘चाहूल’ लवकरच आपल्याला थरारक अनुभव देणार आहे. या मालिकेद्वार हिंदी सिनेसृष्टीतील निर्माते आरव जिंदल आणि विनोद माणिकराव हे पहिल्यांदाच मराठीत पदार्पण करीत आहेत. युफोरिया प्रॉडक्शन्सची ‘चाहूल’ ही रहस्यमयी मालिका आज पासून कलर्स मराठीवर रात्री १०.३० वा. प्रसारित होणार आहे.
निसर्गसौंदर्याने सजलेल्या भोर तालुक्यामध्ये ‘चाहूल’चे चित्रीकरण सध्या चालू असून निर्माते आरव जिंदल आणि विनोद माणिकराव हे दोघेही यात जातीने लक्ष घालत आहेत. ‘चाहूल’च्या निर्मात्यांनी मालिकेच्या चित्रीकरणात कुठल्याही प्रकारची तडजोड न करता ‘चाहूल’च्या कथानकाला साजेसे ग्रॅंजर प्रेक्षकांच्याही लक्षात यावे याकरिता विशेष मेहनत घेतली आहे. या मालिकेमध्ये दृश्यचमत्कृतीसाठी वापरण्यात येणारा ड्रोण कॅमेरा, उत्तम टेक्निशियन्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्सवर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. ड्रोण कमेराद्वारा शूट केलेले मोठमोठे कॅनव्हास आणि टॉप शॉट्सचा इम्पॅक्ट आपल्याला मालिकेच्या प्रत्येक भागांमध्ये अनुभवायला मिळेल. 
मनाला भुरळ पाडणारे लोकेशन, सकस कलाकारांची फौज आणि विशेष म्हणजे रशियन अभिनेत्रीची खास झलक दाखवणारे ‘चाहूल’चे गूढ प्रोमोज् सध्या चॅनेलवर आणि सोशल साईट्सवर दिसत आहेत. एका प्रेमाची अपूर्ण कहाणी उलगडणाऱ्या ‘चाहूल’ या मालिकेच्या प्रोमोजची सर्वत्र चर्चा रंगली  असून प्रेक्षकांमध्ये ‘चाहूल’ची आणि त्याच्या कथानकाबद्दलची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तेव्हा पहायला विसरू नका गूढ.. अगम्य.. ‘चाहूल’ कलर्स मराठीवर सोम. ते शनि. रात्री १०.३० वा.    

Subscribe to receive free email updates: