मराठी माणसाच्या बुद्धीमत्तेबरोबरच त्याचे व्यवहारकौशल्यदेखील हेरणा-या 'विकता का उत्तर' या कार्यक्रमाचा यंदाचा आठवडा,महाराष्ट्राच्या तमाम रसिकप्रेक्षकांना मोठी पर्वणी ठरणार आहे. मराठी माणसांचे भावविश्व, त्याच्या आशा-आकांक्षा टिपणारा हा कार्यक्रम केवळ खेळ म्हणून मर्यादित n राहता सामान्यांना व्यक्त होऊ देणारे हक्काचे व्यासपीठ बनले आहे. कधी हसून तर कधी रडून प्रेक्षकांना आपलेस करण्यात यशस्वी झालेल्या 'विकता का उत्तर' च्या यंदाच्या भागात रसिकांना मनोरंजनाची खुमासदार मेजवानी अनुभवायला मिळत आहे.
मुंबईच्या धकाधकीच्या जगात वावरणाऱ्या असंख्य नोकरदारांपैकी एक असलेले दीपक शिंदे, यंदाच्या भागाचे प्रमुख आकर्षण ठरले. डोंबिवलीला राहणारे हे गृहस्थ बृहन्मुंबई महानगर पालिकेत आरोग्य विभागात कामाला आहे. कुटुंबवत्सल आणि स्वाभिमानी असलेल्या दीपक शिंदे यांची जीवनकहाणी रसिकांना भावूक करून सोडणारी आहे. शून्यातून स्वर्ग निर्माण करण्याची क्षमता असणा-या मराठी माणसांच्या या गुणाचा पैलू येत्या शुक्रवारच्या भागात रसिकांना पाहायला मिळाला. आता शनिवारच्या भागात स्पर्धक म्हणून मुंबई येथील माहीममधून आलेल्या ज्येष्ठ महिला माधुरी मधुसूदन बाळ या देखील 'विकता का उत्तर' च्या शोचे प्रमुख आकर्षण ठरल्या. आजच्या करिअर ओरियेटेड पिढीला त्यांनी जुन्या पिढीचे कुटुंबनियोजनासंदर्भातील मत आणि विचार मांडले. अशाप्रकारे मुंबईच्या वातावरणात राहिलेल्या विविध वयोगटातील मुंबईकरांना अधोरेखित करणारा स्टार प्रवाह वाहिनीवरील 'विकता का उत्तर' चा हा शो रसिकांना आपलासा करणारा ठरत आहे.