चित्रपती कै. व्ही. शांताराम यांनी १९७७ साली व्ही. शांताराम चलत चित्र अनुसंधान व सांस्कृतिक प्रतिष्ठान म्हणजेच ‘व्ही. शांताराम फाउंडेशन’ची स्थापना केली. हिंदी आणि विशेषतः मराठी चित्रपटांचे दस्तावेज तयार करणे, ग्रंथ प्रकाशित करणे, चित्रपट विषयक कार्यशाळा घेणे असे विविध उपक्रम या फाउंडेशन तर्फे आयोजित करावे हे व्ही. शांताराम बापूंचे स्वप्न होते. व्ही. शांताराम यांनी भविष्यात मराठी सिनेसृष्टीचा दस्तावेज संगणकावर नोंदवून ठेवण्याविषयीची इच्छा आपले सुपुत्र किरण शांताराम यांच्याकडे बोलून दाखविली होती.
मराठी चित्रपटांचा समग्र इतिहास ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’(marathifilmdata.com) या संकेतस्थळाच्या निमित्ताने आता सिने रसिकांना आणि अभ्यासकांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. ‘व्ही. शांताराम फाउंडेशन’चे अध्यक्ष किरण शांताराम यांच्या पुढाकाराने या संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. १५ व्या एशियन फिल्म फेस्टिवलच्या सांगता समारंभात ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com)संकेतस्थळाचे उद्घाटन ख्यातनाम दिग्दर्शक शाम बेनेगल यांच्या हस्ते करण्यात आले.
‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळावर १९३२ ते २०१३ दरम्यानच्या चित्रपटांची नोंद पहायला मिळणार आहे. यात चित्रपटाची निर्मिती संस्था, निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, गीतकार, संगीतकार, गायक, कला दिग्दर्शक, संकलक आदी तंत्रज्ञांची सविस्तर माहिती उपलब्ध होईल. ‘विशेष’ या सदरात त्या-त्या सिनेमाचे वैशिष्ट्य अधोरेखित करण्यात आले असून ‘अतिथी कट्टा’ सदरात चित्रपटा संबंधित विविध माहितीचा आस्वाद रसिकांना घेता येईल. या संकेतस्थळाच्या सर्च इंजिनमध्ये एखाद्या दिग्दर्शक अथवा कलावंताचे नाव टाकले असता त्यांच्याशी संबंधित चित्रपटांची यादी सहज उपलब्ध होऊ शकते. या संकेतस्थळामुळे प्रत्येक कलाकारांसोबत तंत्रज्ञाची माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. आगामी काळात २०१३ नंतरच्या चित्रपटांची सूची देखील अपडेट करण्यात येणार आहे. सोबत चित्रपटांचे फोटोग्राफ देखील संकेतस्थळावर अपलोड केले जाणार आहेत. तसेच एखाद्या चित्रपटाचे गीत युट्यूब पाहण्यासाठी संबंधित लिंक देखील यावर देण्यात येणार आहे.
‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’ (marathifilmdata.com) या संकेतस्थळाच्या निमित्ताने वडिलांचे स्वप्न पूर्ण होत असल्याचे समाधान किरण शांताराम यांनी या निमित्ताने व्यक्त केले. मराठी चित्रपटाचा सर्वांगीण विचार करून बनविलेले ‘मराठी फिल्म डाटा डॉट कॉम’(marathifilmdata.com) हे संकेतस्थळ चित्रपटसृष्टीशी संबंधित अभ्यासकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.